आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : आता आकाशात जे काही दिसतय ते डायरेक्ट 15 वर्षानंतरच दिसणार आहे. चंद्राच्या साक्षीनेच आकाशात एक महत्वपूर्ण खगोलीय घटना घडत आहे. अवकाशात दोन ग्रहांच्या भेटीचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. शुक्र आणि गुरु हे ग्रह एकमेकांच्या अत्यंत जवळ येत (Venus and Jupiter Meet) आहेत. खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमीसाठी ही खगोलीय घटना मोठी पर्वणी ठरली आहे. चंद्रपूरकरांनी देखील गुरू आणि शुक्र ग्रहांची विलोभनीय आणि दुर्मिळ अशी युती अनुभवली. चंद्रपूरच्या स्काय वॉच ग्रुपने निरिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.
1 मार्च रोजी सुर्यास्ता नंतर पश्चिम आकाशात अतिशय विलोभनीय आणि दुर्मिळ अशी गुरू आणि शुक्र ग्रहांची युती पहायला मिळाली. ही अशी ग्रहांची युती 15 वर्षानंतर दिसली आहे. ही पुन्हा पाहण्यासाठी 15 वर्षाची वाट पहावी लागणार आहे. चंद्रपूरच्या स्काय वॉच ग्रुपने स्थानिक पंजाबराव देशमुख विद्यालयात निरिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.
सध्या गुरू आणि शुक्र हे मीन राशीत असून ते गेल्या आठवड्यापासून जवळ येत होते. 1 ते 4 मार्च पर्यंत ही युती जवळ राहणार असली तरी सर्वाधिक जवळ 1 मार्चला होते. आकाशात सर्वाधिक तेजस्वी असे दोन ग्रह एक डिग्री पेक्षा कमी अंतरावर येण्याची आणि पाहण्यासाठी ही दुर्मिळ संधी अनेकांनी साधली.
ही युती (Conjunction) भासमान युती होती. जरी हे दोन ग्रह जवळ दिसत असले तरी पृथ्वी पासून त्यांचे अंतर खुप जास्त आहे. ही खगोलीय घटना अनुभवलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तर, चमकणारा तारा अशी शुक्र ग्रहाची ओळख आहे. 22 फेब्रुवारी रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आले होते. विशेष म्हणजे या दोन्ही ग्रहांच्या मध्ये चंद्र आला होता. दोन ग्रहांच्या मध्ये चंद्रकोर असे अत्यंत विलोभनीय दृष्य आकाशात पहायला मिळाले.