अनाथ कार्तिकीला समाजानं दिला आधार, अनोखा विवाह संपन्न

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये सत्यशोधक पद्धतीनं एक अनोखा विवाह संपन्न झाला.

Updated: Dec 25, 2020, 09:46 PM IST
अनाथ कार्तिकीला समाजानं दिला आधार, अनोखा विवाह संपन्न  title=

रवींद्र कांबळे, सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये सत्यशोधक पद्धतीनं एक अनोखा विवाह संपन्न झाला. बेघर निवारा केंद्रामधील कार्तिकीचे अजय डवके याच्यासोबत दोनाचे चार हात झाले. या नववधू कार्तिकीची कहाणी पाहून तुम्हालाही गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही.

बेघर निवारा केंद्रातील कार्तिकीचा विवाह

मिरजमध्ये पार पडलेला हा लग्नसोहळा... बेघर निवारा केंद्रात वाढलेली कार्तिकी आणि नवी मुंबईत केअर टेकरचं काम करणारा अजय डवके.... सत्यशोधक पद्धतीनं या दोघांचा विवाह मिरजमध्ये पार पडला. 

पंढरपूरमधील निर्जनस्थळी 8 महिन्यांची कार्तिकी सापडली होती. दोन दिवस ती मृत आईचं दूध पीत होती. लहान असताना तिला रेणुका शिशूगृहात ठेवण्यात आलं. त्यानंतर भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमध्ये ती वाढली. सध्या बेघर महिला निवारा केंद्रात ती केअर टेकर म्हणून राहत होती. अखेर अजय डवरसोबत तिचा विवाह पार पडला.

कार्तिकीच्या लग्नसोहळ्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेनं पुढाकार घेतला होता. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील आणि डॉ. विनोद परमशेट्टी यांनी तिचं कन्यादान केलं.

समाजानं आधार दिलेली ही अनाथ लेक... आजवर खडतर आयुष्य जगल्यानंतर आता कुठं तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आलेत. कार्तिकी आणि अजयला सुखी संसारासाठी शुभेच्छा... नांदा सौख्यभरे...