जातपंचायतीचं तालिबानी कृत्य, दंड भरला नाही म्हणून विष्ठा खायला लावली

संपूर्ण महाराष्ट्राला चीड येईल असं घृणास्पद कृत्य या जातपंचयातीने केलं आहे

Updated: Oct 8, 2021, 07:39 PM IST
जातपंचायतीचं तालिबानी कृत्य, दंड भरला नाही म्हणून विष्ठा खायला लावली title=

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, उस्मानाबाद : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात जात पंचायतीचा जाच अजूनही सुरूच आहे. याच जाचाला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यात एका दाम्पत्यानं विषप्राशन केल्याची घटना घडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला चीड येईल असं घृणास्पद कृत्य या जातपंचायतीनं केलं आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ढोकी गावात जात पंचायतीचा जाच सहन न झाल्यानं सोमनाथ काळे आणि सुनीता काळे या दाम्पत्यानं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात सोमनाथ काळे यांचा मृत्यू झाला. जातपंचायतीनं ठोठावलेला 2 लाखांचा दंड भरता आला नाही म्हणून त्यांना जातपंचायतीनं अघोरी शिक्षा ठोठावली. समाजानं वाळीत टाकलं. काटेरी चाबकाचे फटके देऊन विष्ठा खायला भाग पाडलं. इतकंच नाही तर पीडित महिलेला जातपंचायतीसमोर नग्न उभं राहण्यास भाग पाडलं असाही आरोप आहे. 

पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणात पोलिसांनी ढोकी गावातील आरोपी पंच कालिदास काळे आणि दादा चव्हाण या दोघांना अटक केली आहे. तसंच 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

नेमकी घटना काय?

जमिनीच्या व्यवहारात जातपंचायतने पती-पत्नीला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला, दंड न दिल्याने या दाम्पत्याला वाळीत टाकत त्यांचा छळ केला जात होता.  जात पंचायतीच्या शिक्षेने अपमान झाल्याने खचलेल्या पती पत्नी यांनी 24 सप्टेंबर रोजी विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता. यात पतीचा 4 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

एकीकडे आपण चंद्रावर जाण्याच्या गप्पा हाकतोय. तर दुसरीकडे गावागावात अजूनही जातपंचायतींचा असा तालिबानी कहर सुरू आहे. त्यांच्या जाचाला कंटाळून आजवर कित्येकांना आपला जीव गमवावा लागलाय. चौकशीअंती या प्रकरणातील दोषींवर कारवाई होईलही. मात्र या जातपंचायतीची पाळंमुळं केव्हा उखडली जातील...हाच खरा सवाल आहे. 

<