Crime News : पुणे- सोलापूर रेल्वेमार्गावर (pune solapur railway) असलेल्या दोन रेल्वे स्थानकांमुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्येच नेहमीच दहशतीचं वातावरण असतं. या दोन स्थानकांमध्ये पडत असलेल्या दरोड्यांमुळे (robbery) प्रवाशांना जीव अक्षरशः जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. कधी कधी या स्थानकांदरम्यान गोळीबाराच्या देखील घटना घडल्याचे पाहायला मिळालं आहे. मात्र पोलिसांनी वाढवलेली गस्त आणि प्रवाशांची सतर्कता यामुळे दरोड्यांचे प्रमाण सध्या कमी झालय. पण तरीही इथून प्रवास करत असताना ज्याप्रकारे सतर्क केलं जाते त्यातून प्रवाशांची झोप काही काळासाठी नक्कीच उडालेली असते.
आम्ही सांगतोय, पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर असणाऱ्या जिंती रोड आणि कुर्डुवाडी रेल्वे स्थानकादरम्यानच्या प्रवासाबद्दल. दौंड रेल्वे स्थानकानंतर प्रवास सुरु झाल्यानंतर सोलापुरातील जिंती रोड ते कुर्डुवाडी यादरम्यान, प्रवास करताना रेल्वे पोलिसांकडून नागरिकांना कायम सतर्क राहण्याचे आवाहन केले जाते. खिडक्या, दरवाजे बंद करण्यापासून ते दागिने, मोबाईल, महत्त्वाच्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्यापर्यंत लोकांच्या हालचाली सुरू होतात.
याला कारणही तसंच आहे. दौंडपासून सुरु झालेला प्रवास कुर्डुवाडी येई पर्यंत लोकांचा जीव भांड्यात पडलेला असतो. या प्रवासादरम्यान होणाऱ्या जबरी चोरीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणांना प्रवाशांना सतर्क करावा लागते. या मार्गावरुन बहुतेक रेल्वेगाड्या या मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास धावत असतात. यामुळे दरोडेखोरांचे चांगलेच फावते. रेल्वेवर दगडफेक करत चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो.
जिंती रोड ते कुर्डुवाडीपर्यंत धोकादायक प्रवास
पुणे सोलापूर मार्गावर असणाऱ्या या रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जिंतीपासून पारेवाडी, वाशिबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुईवाडीपर्यंत क्रॉसिंगमुळे रेल्वे गाड्या थांबतात आणि त्यामुळे दरोड्यासारख्या घटना घडतात. ही स्पॉट डेंजर झोन मानले जातात.
कशी होते चोरी?
जिंती ते कुर्डुवाडी हा भाग उजनी धरणाचा बॅक वॉटर म्हणून ओळखला जातो. 80 किलोमीटरच्या परिसरात हा भाग पसरलेला आहे. मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे इथे शेती, झाडांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. यामुळे दरोडेखोरांना चोरी करुन पळण्यास संधी मिळते. इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या भागामध्ये पोलिसांनाही चोरट्यांचा माग काढणे कठिण होऊन जाते.
कधी कधी दरोडेखोरांकडून रेल्वेची सिग्नल यंत्रणा बंद केली जाते. सिग्नलच्या वायर तोडण्यापासून ते सिग्नल यंत्रणेवर काळे कापड टाकण्यापर्यंतचे प्रकार केले जातात. यासोबत दगडफेक, रेल्वेची चैन ओढणे, सर्किट ब्रेक करण्याचेही प्रकार केले जातात. काही वेळातर रेल्वे रुळांवर दगड ठेवण्याचेही प्रकार समोर आले आहेत. अशावेळी दरोडेखोर शेवटच्या काही बोगींमध्ये चोरीचा प्रयत्न करताता आणि तिथूनच पळ काढतात.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवासी अनेकदा खिडक्या उघड्या ठेवतात. क्रॉसिंगदरम्यान गाड्या थांबलेल्या असताना दरोडेखोर याचा फायदा घेतात आणि शस्त्रांच्या माध्यमातून प्रवाशांना घाबरवून चोरीचा प्रयत्न करतात. काही प्रवासी हे अशावेळी गाड्या थांबलेल्या असताना दरवाजे उघडून थेट खालीसुद्धा उतरतात. त्यामुळे चोरट्यांना आयतं कोलीत मिळतं. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांनी दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्यासोबतच सावधानता बाळगायला हवी.