IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. एकाएकी सुरु झालेला उकाडा कुठच्या कुठे पळाला आणि देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासूनच तापमानाच घट झालेली नोंदवण्यात आली असून बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीय प्रमाणात खाली उतरला.
उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पारा उणे 5 अंशांवर गेला आहे. दरम्यान, सद्यस्थिती पाहता पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
तिथे देशात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच देशाची आर्थिक राजधानी मुंबईसुद्धा या हिवाळ्याचा सामना करताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी मुंबई आणि नजीकच्या परिसरावर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर, अनेकांचे ठेवणीतले स्वेटर आणि लोकरी कपडे आता हळुहळू बाहेर येऊ लागले आहेत.
मुंबईत पारा 15 तर पुण्यात 12.2 अंशावर पोहोचला आहे. अनेक शहरांमधील तापमान किमान 15 अंशांहूनही कमी आहे. उत्तर भारतातल्या थंडीचा परिणाम राज्यातल्या तामपानावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. त्यामुळे सकाळी तसंच रात्री गारठा वाढला आहे. राज्यात निफाडमध्ये 6.8 अंश, नाशिक 9.8 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 24 तासांसाठी राज्यात थंडीची लाट कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील उत्तर भागामध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्याचं वातावरण पाहायला मिळेल. शिवाय पंजाब, चंदीगढ, हरियाणा, दिल्ली या भागांमध्ये तापमान 6 अंशांपर्यंत खाली येऊ शकतं.
पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पाहता हिमालयाच्या पट्ट्यात येणाऱ्या भागामध्ये तुरळक हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, 29 डिसेंबरला या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होईल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, भारत- चीन सीमा भागामध्ये हिमवृष्टी होऊ शकते.
बदलणाऱ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासन सर्वतोपरी सतर्क असून, कोरोनासंदर्भातील सजगता आणखी वाढवताना दिसत आहे. चाचणा वाढवण्यापासून नागरिकांना आजारपण अंगावर काढू नका इथपर्यंतचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.