हे तर मराठी भाषेचे विरोधक; संजय राऊत यांच्या टीकेचा रोख नेमका कुणाकडे?

जागतिक मराठी भाषा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे. महाराष्ट्राची मराठी जनता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. असे असतानाच यावरून राजकारण होत असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय.  

Updated: Feb 27, 2022, 12:47 PM IST
हे तर मराठी भाषेचे विरोधक; संजय राऊत यांच्या टीकेचा रोख नेमका कुणाकडे?  title=

मुंबई : मराठी भाषेच्या डोक्यावर अभिजात भाषेचा दर्जा असलेला सुवर्ण मुकुट चढवा. महाराष्ट्राच्या जनतेने आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी माणसाने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. भाषेवरील अन्याय कुणीही सहन करू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

प्रधानमंत्रीपासून अनेक नेते आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात, उल्लेख करतात. त्याच शिवरायांच्या भाषेसाठी तुमच्याकडे सतत दारात येऊन भीक मागावी लागते याचा कुठेतरी विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.

मराठी माणसाची एका बाजूला बदनामी करायची. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू द्यायचा नाही. मराठीची आर्थिक कोंडी करायची. मराठी माणसाच्या हातात पैसे राहू द्यायचे नाहीत. मराठी पाट्यांना विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला मराठी कट्टा यांसारखे कार्यक्रम घेऊन ढोंग करायची. मराठी भाषेचे हे विरोधक भारतीय जनता पार्टीची लोक आहेत, असा आरोप त्यांनी केला.  

भाजपची भूमिका कायम दुटप्पी राहिली आहे, असा आरोप करतानाच "श्रेय कोणीही घ्या पण मराठीचा मान राखा" असेच राऊत म्हणाले.