‘त्या’दहा गावांमध्ये शेवटचा गणेशोत्सव

पुढच्यावर्षीपासून या राहत्या जागेवर बाप्पाची सेवा करता येणार नसल्याने 'या' दहा गावचे रहिवासी चिंतेमध्ये आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 3, 2017, 09:21 AM IST
 ‘त्या’दहा गावांमध्ये शेवटचा गणेशोत्सव title=

पनवेल : सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. बाप्पासाठी महाल, आरास, देखावे उभारण्यात आले आहेत. भाविक भक्तीभावाने बाप्पाच्या सेवेत दंग झाले आहेत. पण याचवेळी पुढच्यावर्षीपासून या राहत्या जागेवर बाप्पाची सेवा करता येणार नसल्याने 'या' दहा गावचे रहिवासी चिंतेमध्ये आहेत. या दहा गावांमध्ये सुमारे ३५00 कुटुंबे राहत आहेत. या ठिकाणची लोकसंख्या २५ ते ३0 हजारांच्या घरात आहे. 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सध्या जोरदार तयारी सुरु झाली आहे. विमानतळ प्रकल्पाच्या या जागेतील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे.  त्यामुळे पुढच्यावर्षी या जागेत त्यांना गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. या गावांचे गावपण संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर तेथील पारंपरिक गोष्टी, उत्सव यालासुद्धा पूर्णविराम बसणार असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

खंत व्यक्त 

आमच्या पारंपरिक उत्सवांना अप्रत्यक्षपणे प्रतिबंध लागणार आहे,  स्थलांतरित होणाऱ्या ठिकाणी आम्हाला आमची परंपरा जपणे शक्य होईल का? असा प्रश्नवजा खंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित दहा गाव संघर्ष समितीचे नाथा पाटील यांनी व्यक्त केली.

कोणती गावे ?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता पनवेलमधील चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, उलवा, तरघर, कोंबडबुजे या गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे ही गावे स्थलांतरित केली जाणार आहेत.