हजारो हेक्टरवरील सोयाबीनला पावसामुळे कोंब, कपाशीची बोंडेंही सडली; बळीराजा आर्थिक संकटात

शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Updated: Sep 23, 2020, 03:55 PM IST
हजारो हेक्टरवरील सोयाबीनला पावसामुळे कोंब, कपाशीची बोंडेंही सडली; बळीराजा आर्थिक संकटात

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : यंदा पेरणी झाल्यानंतर बोगस बियाणांमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं. यामधून कसाबसा शेतकरी सावरत नाही तर पुन्हा आता अतिपावसामुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. तिकडे पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापसाची बोंडंही आता अति पावसामुळे जमिनीवर सोडायला लागली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे.

यावर्षी सुरुवातीलाच विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यानंतर त्यामधून सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी पिकांचं संरक्षण केलं. त्याला खतपाणी दिलं. परंतु मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं पीक, भरलेल्या सोयाबीनच्या शेंगा आता कोमजल्या आहेत. सोयाबीन पूर्णत: काळे पडत असल्याने दहा टक्केही होण्याची शेतकऱ्यांची आशा आता मावळली आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील वर्षीही सोयाबीन काढणीला आलेल्या वेळेतच मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या वर्षीदेखील सोयाबीन काढणीच्या वेळेस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 30 हजार हेक्‍टरवर सोयाबीन पीक घेतलं जातं.

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरुड मोर्शी तालुक्यातही पावसाने जबर फटका बसला आहे. संत्र्याला गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे. अलीकडे महाराष्ट्रात जो ओला दुष्काळ पडला, त्या अनुषंगाने राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भाजपच्यावतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे.