ना कोरोना, ना लॉकडाऊन, तरीही या जिल्ह्यात बोलवूनही कोणी बाहेर येईना, नक्की का?

 बुलडाणा जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग नसतानाही लॉकडाऊन लावावा लागतोय.   

Updated: Dec 7, 2021, 10:04 PM IST
ना कोरोना, ना लॉकडाऊन, तरीही या जिल्ह्यात बोलवूनही कोणी बाहेर येईना, नक्की का? title=

मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : कोरोनामुळं गावच्या गावं आणि शहरच्या शहरं लॉकडाऊन झालेली आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पाहिली. पण बुलडाणा जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग नसतानाही लॉकडाऊन लावावा लागतोय. नक्की असं काय झालंय, की ज्यामुळे लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झालीय. या मागील नक्की कारण काय हे आपण जाणून घेऊयात. (Tiger terror in Khamgaon in Buldana district of Vidarbha)
 
बुलढाणा आणि खामगावच्या मध्यभागी ज्ञानगंगा अभयारण्य आहे. अजिंठ्याच्या पर्वतरांगेत वसलेल्या या नैसर्गिक जंगलात बिबटे, अस्वलं, हरणं आणि वाघांचा  मुक्त संचार असतो.

तर दुसऱ्या बाजूला खामगाव शहर सिमेंट क्राँक्रिटचं जंगल झालंय. मात्र जंगलातल्या एका वाघोबाला शहारतल्या सिमेंटच्या जंगलात जाण्याचा मोह आवरता आला नाही. मग काय लोकांमध्ये वाघोबाची दहशत पसरली.  

सध्या शहरातल्या या जंगलात वाघाने मुक्काम ठोकला आहे. हा वाघ 3 दिवसांपूर्वी सर्वप्रथम सीसीटीव्हीत दिसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

वनविभाग खडबडून जागं झालं. या वाघाचा शोध सुरु झाला. मात्र वाघाचा शोध सुरू असतानाच, भरवस्तीतल्या एका घराजवळ वाघानं एका गायीच्या वासराची शिकार केली. त्यामुळं खामगावकरांची भीतीनं गाळण उडालीय. 

वाघाच्या दहशतीमुळं शहरात लॉकडाऊन लागल्यासारखी स्थिती आहे.. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुकानं बंद आहेत. नागरिकही धास्तावले आहेत.

या वाघाला पकडण्यासाठी वन विभागानं जंग जंग पछाडलं. प्रयत्नांची पराकाष्टा केली.या वाघाने अमरावती,यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा अशा वन विभागाच्या चार टीमला धंद्याला लावलंय. 

या चारही टीमकडून या वाघाचा शोध सुरु आहे.  वाघाच्या जवळ पोहचूनही त्याला बेशुद्ध करण्यात अपयश आलं. वाघोबा खामगावात बिनधास्त फिरतोय. मात्र त्यामुळं लोकांची पाचावर धारण बसलीये. भीतीमुळे लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं आहे.