Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार

Todays Weather Update : दिवसभर उन्हाळ्याचा उकाडा आणि संध्याकाळी गारवा... असं वातावरण असताना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे आजचं वातावरण? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 17, 2024, 06:38 AM IST
Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार title=

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. अनेक ठिकाणी सध्या उन्हाचा कडाका जाणवतोय. तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं दिलेल्या (Forecast) माहितीनुसार, 16 ते 19 मार्च या काळात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असे. यामध्ये मराठवाड्यासह मध्य माहाराष्ट्रामध्ये देखील ही स्थिती राहणार आहे. 

 मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण (Todays Weather Update) राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात विदर्भात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात अनेक दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका आणि पुन्हा थंडी अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. यातच आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत (Weather Update) आहे. त्यामुळे हवामान विभागाने आजपासून पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील हवामानात सातत्याने बदलाना दिसत आहे. आता बहुतेक सगळ्याच जिल्ह्यांमधून थंडी गायब होत असून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढू लागला आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमानाचा पारा 35 ते 37 अंशाच्या दरम्यान आहे. अशात विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 17 मार्च रोजी राज्यात हवामानाची स्थिती काय राहणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

राज्यात येथे यलो अलर्ट 

मराठवाड्यात काही भागात हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे येथेच अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पिकांच नुकसान 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. ज्यामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांची नासधूस झाली होती. आता हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. तसेच कोकणातही काजू, आंब्याच्या बागांवर वातावरणाा परिणाम झाला आहे. 

आजारपणात वाढ 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बदलत्या वातावरणामुळे आजारपणात वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. खोकला, सर्दीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.