कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी, प्रवासांचा मनस्ताप

वाहनांच्या लांबच लांब रांगा...

Updated: Jun 8, 2020, 12:15 PM IST
कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी, प्रवासांचा मनस्ताप title=

कल्याण : कल्याण डोंबिवलीतून ऑफिसला एसटीने जाण्यासाठी जशा लोकांच्या रांगा लागल्या आहेत तशा वाहनांच्या देखील लांबच लांब रांगा रस्त्यावर दिसत आहे. कल्याण-डोंबिवलीतून बाहेर पडताना मुंबई आणि ठाणेच्या दिशेने जाण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कल्याण भिवंडी मार्ग तसंच कल्याण - शीळ मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे. आता सरकारी कार्यालय बरोबर खाजगी कार्यालयात कर्मचारी वाढवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यामुळे या दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे. 

सोबतच दोन्ही मार्गावर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ही वाहतुक कोंडी आणखी वाढली आहे. यामुळे ऑफिसला निघालेल्या सर्वसामान्य लोकांना कल्याण डोंबिवलीतून बाहेर पडतानाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अनलॉक -1 मधील 'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत आजपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र अनलॉक 1 च्या पहिल्याच दिवशी एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.