राजीव सातव यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली; पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख

कॉंग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. 

Updated: May 16, 2021, 12:45 PM IST
राजीव सातव यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली; पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख

पुणे : कॉंग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज पुण्यात त्यांची प्राणज्योत मालवली. कॉंग्रेसचा आणि देशातील एक उमदा तरुण नेता हरवल्याची खंत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. : नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री

--------------------------

काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.: शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

---------------------------

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे  मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो : अजित पवार, उपमुख्यमंत्री

-------------------------

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो : देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

------------------------

राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे..चार दिवसापूर्वीच विडिओ कॉलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू? : संजय राऊत, शिवसेना नेते

----------------------

राज्याच्या जनतेचा विश्वासू नेता हरवला : सुशिलकुमार शिंदे, जेष्ठ कॉंग्रेसनेते

-------------------------

राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेसचंच नाही,आमच्या मित्र परीवाराचंही मोठं नुकसान : रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री

--------------------------

राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसचा महाराष्ट्राचा आवाज हरपला, त्यांनी नेहमीच आमचे मार्गदर्शक म्हणून काम केलं. आम्हाला आजून ही त्याच्या कडून अपेक्षा होत्या. सातव यांच्या जाण्याने पक्षा सोबतच माझं ही वैयक्तीक नुकसान :  सतेज पाटील, गृहराज्यमंत्री

--------------------------

आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त : नाना पटोले, कॉंग्रेस नेते.

------------------------------

राजीव सातव यांचं जाणं धक्कादायक आहे. पक्षसंघटनेसाठी आयुष्य वाहिलेल्या एका सच्चा कार्यकर्त्याला आपण मुकलो. माझ्या साठी हे वैयक्तिक नुकसान आहे. : यशोमती ठाकूर, कॉंग्रेस नेत्या

------------------------------