नाशिक : नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी आज स्वीकारली आहेत. सकाळी त्यांनी महापालिका कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. नाशिक इथं महापालिका आयुक्त म्हणून काम करण्यासाठी मोठा वाव आहे.
असं मुंडे यांनी पुण्यातून बदली झाल्यानंतर स्पष्ट केलं होतं. प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून मुंढे परिचित आहेत. यापूर्वी पुण्यातील पीएमपीएमएल, नवी मुंबई महापालिका आणि इतर ठिकाणी धडाकेबाज निर्णय घेत यंत्रणेला शिस्त लावली होती.
नाशिक इथंही ते चांगले बदल घडवतील अशी नाशिककरांना अपेक्षा आहे. महापालिकेतील कामचुकार कर्मचारी, अधिका-यांना मात्र कारवाईच्या भितीनं धडकी भरली आहे. तुकाराम मुंढे नाशिकला येणार असल्याची बातमी कळताच नाशिकच्या तरुणाईने सोशल मीडियावर त्यांचं उस्फूर्त स्वागत केले आहे. कुणी आपले स्टेटस तर कुणी पोस्ट टाकत राजकीय नेत्यांची हुर्यो केली आहे.