नागपूर: नागपूरमध्ये काही लोकांकडून एका ट्रक चालकाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधीचा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या वडधामना परिसरातील आंध्रा-कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालयात रविवारी हा प्रकार घडला.
संबंधित ट्रान्सपोर्ट एजन्सीने चार दिवसांपूर्वी पीडित ट्रक विक्की सुनील आगलावे या चालकाला ट्रकमध्ये लोड केलेले साहित्य ( ज्यामध्ये व्हॉल्वो बस चे काही पार्टस होते ) थिरुवनंतपुरमला पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी विक्कीला रस्त्यातील टोल टेक्स आणि इतर खर्चासाठी ३५ हजार रोख रक्कम दिली होती. याशिवाय, १२ हजार रुपयांचे डिझेल ही भरून दिले होते.
मात्र, विक्कीने थिरूवनंतपुरमला जाण्यापूर्वीच सर्व पैसे खर्च केले. याशिवाय, ट्रकमधील डिझेलही परस्पर विकून टाकले. यानंतर विक्की बरेच दिवस बेपत्ता होता. हा ट्रक अखिल पोहनकर यांच्या मालकीचा आहे. ते एका राजकीय संघटनेचे पदाधिकारी आहेत.
Nagpur: Two transporters Akhil Pohankar & Amit Thakre have been arrested for allegedly assaulting a driver employed by Pohankar. The driver Vicky Aaglawe was hung with a rope tied to the office ceiling & beaten up with belt & sticks. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/K32z0XRyvw
— ANI (@ANI) July 28, 2019
अखेर रविवारी पोहनकर यांना विक्कीचा पत्ता लागला. तेव्हा अखिल पोहनकर आणि त्यांचा साथीदार अमित ठाकरे यांनी विक्कीला गाठले आणि वडधामना येथील कार्यालयात नेले. याठिकाणी विक्कीला छतावरील पंख्याच्या हुकला दोरीने लटकावून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.
हा सर्व प्रकार सुरु असताना त्याठिकाणी अनेक लोक उपस्थित होते. त्यापैकी काहीजणांनी मोबाईलमध्ये या सगळ्याचे चित्रीकरण केले. यानंतर हा व्हीडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, या सगळ्यानंतर पोलिसांनी अखिल पोहनकर आणि अमित ठाकरे यांच्याविरोधात भांदविच्या कलम ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला.