Uddhav Thackeray Aurangabad Sabha : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्य आज जाहीर सभेत बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडलं.
'महागाई वाढतेय, रुपया घसरतोय, पण आम्हाला चिंता कसली आहे. कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे. ज्ञानव्यापी मंदिराखाली काय आहे. आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? चला होऊन जाऊदे, शिवसेनेने हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपने हिंदुत्वासाठी काय केलं हे खुल्या मंचावर होऊन जाऊ दे.'
'बाबरीत शिवसैनिक गेले नव्हते असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत, संभाजीनगरचे मोरेश्वर सावे आणि शिवसैनिक होते आणि सावे गेले नसतील बाबरीत तर फडणवीसजी तुमच्याकडे आलेले त्यांचे चिरंजीव जे आमदार झाले आहेत त्यांनी सांगावं की माझे बाबा गेले नव्हते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आमदार झाले आहेत. म्हणजे खरं खोटं काय ते होऊन जाऊदे.'
'कोणाला हिंदुत्व शिकवताय, हा गेल्या काही दिवसांपूर्वीचा इतिहास आहे. त्या वेळेस शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी घेतली नसती तर, अमरनाथ यात्रेवर जेव्हा गडांतर आलं होतं, तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी इथून वाघाची डरकाळी मारली नसती तर आज हिंदुत्वाच्या जोरावर तुम्ही दिल्ली काबिज करु शकला असतात काय हे आधी स्वत:ला विचारा आणि मग आमच्या अंगावर या?'
'काश्मिरमध्ये हिंदुंना घरात घुसून गोळ्या मारतायत, पण यांना त्याचं काही घेणं देणं नाही. यांना नको तिकडे काड्या लावायच्या आहेत. तिथे काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसाचं पठण करा, उगाच कुठेतरी जाऊन दुधाचा अभिषेक करतायत, हनुमान चालिसा म्हटलं नाही तर हिंदुत्व नाही. हे नामर्दचं हिंदुत्व आमच्याकडे नाही. मर्द असाल तर पहिलं काश्मिरी पंडितांचं रक्षण करा. हिम्मत असेल तर तिकडे जा.'
'ही शिवसेना म्हणजे शिवसेनाप्रमुखांची नाही असं म्हणतात. मी उद्धव ठाकरे म्हणून शुन्य आहे मध्ये बाळासाहेब नाव आहे म्हणून मी तुमच्यासमोर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करताय.'
'बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं मला देवळात घंटा बडवणारा नाही तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा आहे.'
'आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, भाजपचे बेलागम सुटलेले प्रवक्ते आहेत त्यांच्या डोक्यात काहीतरी अक्कल घातली पाहिजे. जर तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली आणि उद्या आमचा संयम तुटला तर तुमच्याच भाषेत तुमच्यावर टीका केल्याशिवाय आमचे प्रवक्ते राहणार नाहीत. '