'BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा', ठाकरेंची टीका; म्हणाले, 'अनुभवी भ्रष्टाचारी नेते..'

Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: "काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. ‘भाजपा’ परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता. त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारा आहे."

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 26, 2024, 06:34 AM IST
'BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा', ठाकरेंची टीका; म्हणाले, 'अनुभवी भ्रष्टाचारी नेते..' title=
ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: "देश हुकूमशाहीकडे निघाला आहे. त्या हुकूमशाहीचे सारथ्य भारतीय जनता पक्ष करीत आहे. आणीबाणी काळात इंदिरा गांधी यांनी देशावर हुकूमशाही लादली व सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य खतम केले म्हणून तेव्हाचा जनसंघ (आजचा भाजपा) लढा देत होता. आज तोच भाजपा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून एकाधिकारशाही, हुकूमशाहीच्या खाईत देशाला ढकलत आहे," अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने देशातील सर्वात मोठ्या पक्षावर निशाणा साधला आहे. भाजपाचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्व लहान पक्ष कायमचे संपविण्यासंदर्भात केलेल्या कथित व्यक्तव्यावरुन ही टीका करण्यात आली आहे. "भाजपाचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्व लहान पक्ष कायमचे संपवण्याची भाषा हे त्याच हुकूमशाही प्रवृत्तीचे लक्षण आहे," असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

छोटे पक्ष संपवून फक्त आम्हीच...

"बावनकुळे हे भाजपाचे एक थिल्लर तसेच सामान्य ज्ञानाची वानवा असलेले नेते आहेत. त्यांचे वक्तव्य तसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, पण बावनकुळ्यांची भाषा ही त्यांची नसून मोदी-शहा-नड्डांच्या भूमिकेचा उद्घोषच ते करीत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. दोन वर्षांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनीही आगामी काळात शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवू व देशात फक्त एकमेव भाजपा हाच पक्ष राहील अशी पिपाणी फुंकली होती. आता बावनकुळे यांनीही तोच सूर पुढे नेला. बावनकुळे म्हणतात, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपामध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे-छोटे पक्ष संपवा. बावनकुळ्यांचे हे विधान लोकशाहीला घातक आहे. छोटे पक्ष संपवून फक्त आम्हीच राज्य करणार या वृत्तीस नेमके काय म्हणावे?" असा प्रश्न ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

भारतीय जनता पार्टीच काँग्रेसयुक्त

"भारतीय संविधानाने स्वातंत्र्य व लोकशाहीबाबत जी तत्त्वे सांगितली आहेत, त्यात बावनकुळेंची मुक्ताफळे कोठेच बसत नाहीत. मोदी यांनी 2014 मध्ये काँग्रेसमुक्त देशाची घोषणा केली, हेसुद्धा लोकशाहीविरोधी वक्तव्य आहे. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. ‘भाजपा’ परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता. त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारा आहे व त्यांनी काँगेसमुक्त भारताचा नारा दिला, पण गेल्या दहा वर्षांत काँगेस संपली नाहीच, उलट भारतीय जनता पार्टीच काँग्रेसयुक्त झाला," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

भ्रष्टाचाऱ्यांना भाजपाने पक्षात घेतलं

"काँग्रेससह अनेक पक्षांतील ‘अनुभवी भ्रष्टाचारी’ नेते भाजपाने आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे इतर पक्ष भ्रष्टाचारमुक्त झाले, पण भाजपाचे मात्र डबके बनले याचे भान बावनकुळ्यांना आहे काय?" असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे. "भाजपा हा नातीगोती, युती, विचारधारा वगैरेंना मानणारा पक्ष नाही. जे जे पक्ष भाजपासोबत गेले त्या पक्षांना संपविण्याचे काम भाजपाने केले. गरजेपुरते वापरायचे व गरज संपली की, फेकून द्यायचे हेच भाजपाचे धोरण आहे. महादेव जानकर, बच्चू कडू, सदाभाऊ खोत वगैरे लोक भाजपाचे सध्याचे सगेसोयरे आहेत. मात्र बच्चू कडू यांनीही आताच सांगितले आहे की, ‘‘लहान पक्षांना बरोबर घेऊन त्यांना ठेचून काढण्याची भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे. त्याचा अनुभव आम्हीही घेत आहोत.’’ त्याच वेळी महादेव जानकर यांनीही आपली खदखद बाहेर काढली. जानकर म्हणतात, ‘वापरा आणि फेका’ हे भाजपाचे तत्त्व आहे. त्यामुळे मित्रपक्षांचा वापर करून भाजपा त्यांना नंतर बाजूला करतो. सदाभाऊ खोत यांच्या लहान पक्षानेही मागे हेच दुःख व्यक्त केले. उद्या मिंधे गट, अजित पवार गट यांनीही हेच दुःख व्यक्त केले तरी आश्चर्य वाटणार नाही," असं अग्रलेखात म्हटलं आहे.

...तर हे लोक रामालाही अडगळीत टाकतील

"‘वापरा आणि फेका’ हेच भाजपाचे धोरण आहे व ते फक्त आपल्या मित्रपक्षांपुरतेच मर्यादित नसून स्वपक्षातील अनेक दिग्गजांबाबतही त्याचे तेच धोरण आहे. श्रीरामाचे मंदिर उभारले हे खरे, त्याची प्राणप्रतिष्ठाही झाली, पण लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी श्रीराम कामी येत नाहीत हे लक्षात आले तर हे लोक रामालाही अडगळीत टाकतील. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, रविशंकर प्रसाद यांच्यासारख्यांना कधीच फेकून दिले. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या कुटुंबास डोके वर काढू दिले जात नाही, पण त्यांच्या नावाचा पुरेपूर वापर करून घेतला आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

एकही पक्ष भाजपा संपवू शकला नाही

"मध्य प्रदेश व राजस्थानच्या निवडणुका जिंकण्यासाठी शिवराजमामा चौहान व वसुंधराराजे शिंदे यांचा वापर केला, पण निवडणुका जिंकताच या दोघांनाही असा काही धक्का दिला की, आपण नक्की कोठे फेकले गेलो आहोत तेच त्यांना समजू शकले नाही. शरद पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो, असे पंतप्रधान मोदी सांगत होते. त्याच पवारांचा पक्ष मोदींनी फोडला. शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजपा वाढला, पण त्याच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपाने शिवसेना फोडली. अर्थात, एवढे सगळे उपद्व्याप भाजपाने केले तरी यापैकी एकही पक्ष भाजपा संपवू शकलेला नाही. उलट महाराष्ट्रात शिवसेना व शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने पुढे निघाला आहे," असा उल्लेख लेखात आहे.

भाजपाला आयसीयूमध्ये नेण्याची तयारी करा

"भाजपा हा परावलंबी पक्ष बनला असून इतरांच्या उधार-उसनवारीवर जगत आहे. ईडी आणि सीबीआयच्या कुबड्यांवर तो टिकून आहे. जे स्वतःच परावलंबी आहेत त्यांनी दुसऱ्यांना संपविण्याची बेताल भाषा करू नये. 2024 च्या निवडणुकीनंतर इतर सगळे पक्ष शाबूत राहतील, पण फडणवीस, बावनकुळ्यांचा भाजपा महाराष्ट्रात राहील काय? हाच प्रश्न आहे. कोणाला फेकायचे व कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचे हे जनता ठरवत असते. ईव्हीएम, ईडी, सीबीआयचा वापर करून स्वतःचा पक्ष सुजवणारे ते ठरवू शकत नाहीत. उद्याचा काळ भाजपासाठी विषकाल आहे. बावनकुळे, तुमच्या पक्षाला अतिदक्षता विभागात उपचारांसाठी नेण्याची तयारी करा," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.