उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्त विजया कंठे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विजया कंठे यांनी रस्त्याच्या कामासाठी पैसे मागितल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. याबाबतचा त्यांचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प ५ भागातल्या एका अंतर्गत रस्त्याच्या कामाची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. याबाबत जानेवारी महिन्यात पालिकेसमोर उपोषणही करण्यात आलं होतं. मात्र हा रस्ता तयार करून देण्यासाठी उपायुक्त विजया कंठे यांनी आपल्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप, स्थानिक रहिवासी आणि तक्रारदार राजू झनकर यांनी केलाय.
याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी समोर आणला असून, त्यात विजया कंठे ५० हजार रुपये द्या असं म्हणताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचा आरोप, विजया कंठे यांनी केलाय. या प्रकरणी तक्रारदार राजू झनकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.