यवतमाळ येथे दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत चार जणांचा बळी

जंगली जनावरांसाठी शेतात सोडलेल्या विद्युत तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू...

Updated: Sep 10, 2020, 06:57 PM IST
यवतमाळ येथे दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत चार जणांचा बळी  title=
संग्रहित फोटो

यवतमाळ : यवतमाळच्या वसंतपूर बोरी गोसावी इथे शेतात काम करणाऱ्या दोन मुलांना विजेचा शॉक बसून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विक्की जनार्दन राठोड आणि सुरज भोपीदास राठोड अशी दोघांची नावं आहेत. ही दोन्ही मुलं सध्या शाळा कॉलेज बंद असल्याने शेतात शेतमजुरी करत होती. एका शेतात खतं देण्यासाठी दोघे गेले होते. मात्र जंगली जनावरांसाठी शेतात सोडलेल्या विद्युत तारेच्या कुंपणाला या दोघांचा स्पर्श झाला आणि दोघेही दगावले.

जंगली जनावरांपासून शेतपिकाचे रक्षण करण्यासाठी अवैधरित्या वीज चोरी करुन तार कुंपणात विघुत प्रवाह सोडण्यात आला होता. विजेच्या या धक्क्याने दोघेही मुले फेकली गेली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी महावितरण आणि पोलीस विभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करुन कारवाई सुरु केली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथील वाघाडी धबधबा परिसरात तीन युवक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पैकी दोघांचा मृत्यू झाला तर एकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. तुषार पवार आणि तुषार राठोड असे मृताचे नाव आहे. 

हे तिघे येळाबारा येथील वाघाडी धबधबा परिसरात गेले होते. तेथे त्यांना पोहण्याचा मोह झाला. या तिघांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र काही वेळातच तिघेही बुडत असल्याचे दिसून आले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ही बाब उपस्थितांच्या लक्षात येताच त्याने तिघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात एकाल वाचवण्यात यश आले. मात्र दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह आढळले.