नवी दिल्ली : पुणे विद्यापीठाने जाहीर केलेले ते वादग्रस्त परिपत्रक मागे घेतले आहे. जे विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असतील त्यांनाच सुवर्ण पदक मिळेल असा निर्णय या परिपत्रकातून घेण्यात आला होता.
महर्षी किर्तीकर शेलार मामा गोल्ड मेडल साठी लागणारी पात्रता आणि निकष नोटीस बोर्डवर लावण्यात आले होते. यामध्ये शाकाहारी आणि निर्व्यसनी असणाऱ्यांचाच महर्षी किर्तीकर शेलार मामा गोल्ड मेडलसाठी विचार केला जाईल असे यामध्ये नमूद केले आहे. यामूळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान हे परिपत्रक आमचे नसून महर्षी किर्तीकर शेलार मामा प्रतिष्ठानचे असल्याचा खुलासा विद्यापिठाकडून करण्यात आला आहे.
या नोटीसमध्ये एकूण १० निकष दिले असून दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत प्रथम किंवा द्वितीय श्रेणीत पास होणे अनिवार्य असल्याचेही म्हटले आहे. मेडलसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास भारतीय संस्कृती विषयात आवड असणे गरजेचे आहे असा ही एक मुद्दा यामध्ये आहे.
तर दुसऱ्या एका मुद्द्यानुसार योग, प्राणायम आणि ध्यान करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पदकासाठी प्राधान्य दिले जाईल असे यात नमूद केले होते. तसेच लवकरच हे परिपत्रक महाविद्यालयाच्या वेबसाईटवरुन हटविण्यात येईल असेही पुणे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
हे परिपत्रके समोर आल्यापासून टीकेची झोड उठत आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरही व्हायरल होत असून अनेकजण तिथेही आपला राग व्यक्त करीत आहेत.
"पुणे विद्यापीठाच्या या अटी निराशाजनक आणि धक्कादायक आहेत असे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
Shocking disappointing decision by Pune University - so proud of education in our state, What has happened to our universities . Please focus on Education not food.
— Supriya Sule (@supriya_sule) November 10, 2017
आमच्या विद्यापीठांना काय झाले आहे ? असा सवाल करत विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याकडे पाहण्यापेक्षा शिक्षणाकडे लक्ष द्यावे असा सल्लाही त्यांनी पुणे विद्यापीठाला दिला आहे.
तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयावर टीका करत वक्तव्य केले आहे. कोणी काय खावे अथवा खाऊ नये याकडे लक्ष न देता विद्यापीठाने पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत व्यक्त केले.