Son Killed Mother: आई नऊ महिने पोटात वाढवून बाळाला जन्म देते. नव आयुष्य देते. या आईचे उपकार फेडण्यासाठी 7 जन्मही कमी पडतात, असं म्हटलं जातं. पण पैशाच्या मोहापायी याच आईची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधून आई-मुलाच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार समोर आलाय. यामध्ये एका मुलाने आपल्या आईचीच हत्या केलीय. का केली ही हत्या? काय घडलीय घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आईच्या नावचे इन्शुरन्सचे पैसे मिळतील आणि आपण कर्जातून मुक्त होऊ, या उद्देशाने तरुणाने ही हत्या केली. हिमांशू असे या आरोपीचे नाव आहे. आईच्या मृत्यू नंतर इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांचा दावा त्याला करायचा होता. यासाठी त्याने जन्मदात्या आईला संपवलं आणि तिचा मृतदेह यमुना नदीच्या किनारी फेकला.
आरोपी हिमांशूला ऑनलाईन गेमिंगचा नाद लागला होता. यात तो पैसे हरु लागला होता. आणखी पैसे मिळवण्यासाठी त्याला उधारी घ्यावी लागली. तरीही त्याने खेळणे सुरुच ठेवले. साधारण 4 लाख रुपयाचे कर्ज झाल्यावर त्याला जाग आली. कर्ज देणारे त्याच्याकडे तगादा धरु लागले. आता हे कर्ज फेडायचं कसं? असा प्रश्न त्याला पडला.
यासाठी त्याला आपल्या आई प्रभाच्या नावे इन्शुरन्स प्लान घेऊन नंतर तिला संपवायचं होतं. सर्वात आधी त्याने मावशीचे दागिने चोरले आणि 50 लाख रुपयांची लाइफ इन्शुरन्स पॉलिसी काढली. वडील रोशन सिंग चित्रकूट मंदिरात गेले होते. त्यावेळी त्याने आईची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याने आईचा मृतदेह एका बॅगेत ठेवला आणि बॅग ट्रॅक्टरमध्ये टाकून यमुनेच्या किनारी गेला.
वडिल मंदिरातून घरी परतले त्यावेळी त्यांना पत्नी आणि मुलगा घरी दिसले नाहीत. त्यांनी आजुबाजूला चौकशी केली आणि भावाच्या घरी गेले. दरम्यान तिला हिमांशूसोबत नदीजवळ पाहिल्याचे एका शेजाऱ्याने सांगितले.
यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली. पोलिसांनी यमुना नदीजवळ शोध घेतला असता त्यांना हिंमाशूच्या आईचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी हिमांशूची कसून चौकशी केली. त्यावेळी मला कर्ज फेडायचे होते म्हणून मी आईची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
आपल्या आईची हत्या करुन हिमांशू पळून जाण्याच्या तयारीत होता. पण आम्ही त्याला पकडले आणि त्याने आपला गुन्हा कबूल केलाय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय शंकर मिश्रा यांनी दिली.
इंटरनेटवर ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म्सना प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये काही यूजर्स चांगली कमाई करतात. पण कमी वेळात पैसे कमावण्याची इच्छा सवयीमध्ये बदलून जाते. ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून म्हणून बघा. हे खेळताना काय करायचे आणि काय नाही याची माहिती देण्यात येते. पण यूजर्स पैशाच्या हव्यासापायी याकडे दुर्लक्ष करतात. वेळसप्रसंगी कर्ज काढून खेळतात. परिणामी या सर्वाचा शेवट दुर्देवी होतो.