सासूनं सूनेच्या डोक्यात घातला फ्लॉवरपॉट

 फ्लॉवरपॉट डोक्यात घालून  सासूनं सूनेचा जीव घेतला आहे. 

Updated: Dec 15, 2019, 10:50 PM IST
सासूनं सूनेच्या डोक्यात घातला फ्लॉवरपॉट

प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : सासू-सुनांचं भांडणाच्या कहाण्या आपण सिनेमात पाहिल्या आहेत, प्रत्यक्षातही अनेकदा घडत असतात. पण वसईमध्ये झालेल्या सासू सुनेचे भांडण इतके विकोपाला गेले की सुनेला आपला जीव गमावावा लागला आहे. वसईत एका सासूनं सूनेचा खून केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात सासून फ्लॉवरपॉट डोक्यात घालून  सासूनं सूनेचा जीव घेतला आहे. आनंदी माने असे या सासूचे नाव आहे.

आनंदीचा मुलगा रोहन आणि रियाचं लग्न झालं होतं. दोघांना सहा महिन्यांची मुलगी आहे. तिघेही अमेरिकेला राहात होते. आनंदीला रिया आवडायची नाही. रियामुळे आपला मुलगा आपल्यापासून दूर गेला, असं आनंदीला वाटायचं.

पंधरा दिवसांपूर्वीच रिया तिच्या मुलीसह भारतात आली होती. सतत दोघींचे खटके उडत होते. भांडणादरम्यान आनंदीनं फ्लॉवरपॉट उचलला आणि रियाच्या डोक्यात जोरदार वार केले. त्यात रियाचा मृत्यू झाल्याचे माणिकपूर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. 

आनंदी मानेनंच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सूनेचा खून केल्याचं सांगितलं. पोलिसांनी आनंदीला अटक केली आहे. 

दरम्यान रियाच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या सर्वांनी मिळून खून केल्याचा आरोप केला आहे. प्रचंड धक्कादायक अशा घटनेनं संपूर्ण वसई हादरुन गेली आहे.