यवतमाळ : जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध वैष्णोदेवी दर्शनासाठी गेलेले पर्यटक अतिबर्फवृष्टीमुळे अडकले आहेत. महाराष्ट्रातील यवतमाळच्या दहा पर्यटकांचा यात समावेश आहे. जम्मू-काश्मीर येथे मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. दरम्यान, जम्मूतील पटणीटॉप येथे आनंद लुटण्यासाठी गेलेले पर्यटक अडकले आहेत. सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घेण्यात आली आहे.
पटणीटॉप भागात सध्या जोरदार बर्फ पडत आहे. तपमान खूप खाली गेले आहे. सातत्याने बर्फ पडत असल्याने अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी सैन्यदलाकडून प्रयत्न सुरु आहेत. पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर जम्मू प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरु आहेत.
पवन अराठे, विकास शेटे, मनीष देशपांडे, प्रशांत शेटे, शेखर एनगंतीवर, शुभम गिरमकर,सागर सूर्यवंशी, रितेश निलावर, रवी ठाकूर अशी अडकलेल्या पर्यटकांची नावे आहेत.