प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या थरार घटनेने भंडारा जिल्हा हादरुन गेला आहे. प्रेमप्रकरणातून तीन आरोपींनी एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या केली. हत्येचा हा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नेमकी घटना काय?
हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं सचिन म्हस्के असं आहे. प्रेमप्रकरणात सचिन म्हस्के एका मुलीला घेऊन पळून गेला. याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रारही केली. यानंतर सचिन आणि ती मुलगी आपापल्या घरी परतले. पण यानंतरही सचिन त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना सतत फोन करुन त्रास देत होता.
याचा राग मनात धरुन मुलीच्या कुटुंबियांना सचिनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. आज संध्याकाळी मुलीच्या कुटुंबियांपैकी दोघं जण सचिनबरोबर त्याच्याच बाईकवर बसून तुमसर शहरात आले. त्यानंतर तिथे आणखी एक तरुण आला आणि त्यांनी सचिनला घेरलं. यापैकी तिसऱ्या तरुणाने सचिवर धारदार शस्त्राने हल्ला केला. तर इतर दोघांनी सचिनला धरून ठेवलं.
आरोपीने सचिनवर एकामागोमाग एक अनेक वार केले. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या या घटनेनं भंडारा जिल्हा हादरून गेला आहे.