बारामती: तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. एका सजग नागरिकाने अचानक शाळेला भेट दिल्यामुळं हा प्रकार उघडकीस आला आहे.
बारामती तालुक्यातील तरडोली येथील भोईटे वस्ती येथील शाळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे. याबाबतचा नागरिकाने शिक्षकाचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित शिक्षकाच्या चौकशीसाठी समिती नेमली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे.
भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत 25 विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या वर्षभरापासून शिक्षकाचे अशाच प्रकारचे वागणे आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. मात्र दारुचे व्यसन काही सुटले नाही.गावकऱ्यांनी दिलेली संधी सरावलेल्या शिक्षकाने वाया घालवली. शाळेत येणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना मद्यधुंद अवस्थेत येणारा गुरुजी पहावा लागत आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेला होता. भरपूर दारू प्यायल्याने ते शुद्धीतही नव्हते हे नागरिकांच्या लक्षात आले व त्या व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. दोन नागरिक त्यांना जाब विचारत आहेत. मात्र शिक्षक काहीच बोलत नसल्याचे दिसत आहे. व्हिडिओ शूट करणारे त्यांना तुम्ही चालू शाळेत कसं काय झोपू शकता, असा प्रश्न विचारत आहे. त्यावर शिक्षक त्यांना माझं ऑपरेशन झालंय, असं सांगताना दिसत आहे. या व्हिडिओची गंभीर दखल घेण्यात आली असून याची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे.
मद्यधुंद अवस्थेत शाळेत येणाऱ्या संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. या शिक्षकाची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात येणार आहे. त्यानंतर अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाईदेखील होईल असे शिक्षणाधिकारी गावडे यांनी सांगितले आहे. तर या प्रकरणी मुख्याध्यापकाला देखील नोटीस बजावली असल्याचे गावडे यांनी सांगितले.