लग्नाचं आमिष दाखवत 23 लाख रुपये उकळले, विराटकडून पुण्यातील दोन तरुणींची फसवणूक

मॅट्रीमोनी साईटवर झालेली ओळख पुण्यातील दोन तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. आरोपीने या तरुणींचा विश्वास संपादन करत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सागर आव्हाड | Updated: Jun 9, 2023, 06:23 PM IST
लग्नाचं आमिष दाखवत 23 लाख रुपये उकळले, विराटकडून पुण्यातील दोन तरुणींची फसवणूक title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  लग्नाचं आमिष दाखवून दोन तरुणींकडून लाखो रुपये उकळल्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. जीवनसाथी वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणानं दोन तरुणींना गंडा घातला. याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. आरोपीचं नाव विराट पटेल असं असून त्याची आणि या तरुणीची ओळख जीवनसाथी संकेतस्थळावर (Matrimony Site) ओळख झाली. आपण परदेशात काम करत असल्याचं सांगत त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. दोघांमध्ये बोलणं सुरु केलं. तरुणीचाही त्याच्यावर विश्वास बसला.

काही दिवसांनी आरोपी विराटने तिच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू  (Precious Gifts) पाठवल्याचं सांगितलं. पण दिल्ली विमानतळावर भेटवस्तू कस्टममध्ये (Customs) अडकली असून ते सोडवण्यासाठी पैसे लागणार असल्याचं सांगत महिलेकडून 30 हजार रुपये उकळले. त्यानंतर त्याने पैशांची मागणी सुरुच ठेवली. कधी इन्कम टॅक्स तर कधी इम्पोर्ट टॅक्स अशी वेगवेवगळी कारणं देत आरोपीने तरुणीकडून तब्बल 13 लाख रुपये लुटले. फसवणूक झालेली ती एकटीच तरुणी नव्हती. तर पुण्यातील खराडी इथं राहणाऱ्या एका तरुणीलाही आरोपी विराट पटेलने असाच गंडा घातला. या तरुणीकडून आरोपीने 1 लाख 30 हजार रुपये लुटले.

पिंपरीतही अशीच घटना
काही महिन्यांपूर्वी पिंपरीतही अशीच घटना घडली होती. मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाने घरी येऊन तरुणीला लग्नाची मागणी घातली. त्या तरुणीचा विश्वास संपादन करुन तिच्याकडे 1 लाख 70 हजार रुपयांच दागिने घेऊन तो पसार झाला. चिखली मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी एका 33 वर्षाच्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) तक्रार दाखल केली. किरण पाटील असं या तरुणाने आपलं नाव सांगितलं होतं. 

तक्रारदार महिला आणि आरोपी किरण पाटील यांची संगम डॉट कॉम या सोशल मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरु झालं. काही दिवसांनंतर किरण पाटील थेट त्या तरुणीच्या घरी गेला. तिला लग्नाचं आमिष दाखवून त्याने त्या तरुणीचा विश्वास संपादन केला. लग्नासाठी केलेले दागिने दाखवण्याची मागणी त्याने त्या तरुणीकडे केली. तरुणीनेही त्याला दागिने दाखवले. यात 4 तोळ्यांचं गंठण, अंगठी आणि इतर छोटेमोठे दागिने असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचे दागिने घेऊन आरोपी किरण पाटील फरार झाला.