पेरणीची करू नका घाई, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. 

Updated: Jun 10, 2021, 08:31 PM IST
पेरणीची करू नका घाई, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

अनिरूद्ध दवाळे, अमरावती : राज्यात सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावलीय. शेतक-यांसाठी ही समाधानाची बाब आहे. मात्र तरीही शेतक-यांनी लगेचच पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. 

यंदा राज्यात वेळेआधीच मान्सून सक्रिय झालाय. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आलाय. अशाचत कृषी विभागानं मात्र 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन केलंय. अद्याप जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. 

ब-याचदा शेतकरी पहिल्या पावसानंतर लगेचच पेरणी करतात. मात्र पावसानं पाठ फिरवल्यास दुपार पेरणीचं संकट ओढावतं. त्यामुळेच कृषी विभागानं 15 ते 17 जूननंतरच शेतक-यांनी पेरणी करावी असा सल्ला दिला आहे. 

गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता. सुरूवातीच्या पावसानंतर शेतकरी लगेचच पेरणी करतात. मात्र त्यानंतर पाऊस नसेल तर पेरणीही वाया जाते शिवाय दुबार पेरणीचा भुर्दंडही सोसावा लागतो. त्यामुळे शेतक-यांनी संकट टाळायचं असेल तर सावध राहायला हवं.