Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 जागा पदरात पाडून घेतल्या. त्यासाठी महायुतीत मोठा भाऊ असलेला भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी त्यांना संघर्ष करावा लागला. काही ठिकाणी विद्यमान खासदारांचे पत्ते कापले. त्यामुळं पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. जागावाटपाला विलंब झाल्यानं अनेक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना प्रचाराला कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री शिंदे स्वतः जोरदार कामाला लागलेत.
रामटेकमध्ये शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस मुक्कामाला होते. हिंगोलीत हेमंत पाटलांचा पत्ता कापल्यानं नाराजीला उधाण आलं. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मुक्काम ठोकून हिंगोलीत थांबले. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघांवरही मुख्यमंत्र्यांनी खास लक्ष दिलं. कोल्हापुरात ते तब्बल तीन दिवस मुक्कामाला होते. स्थानिक पदाधिकारी तसंच महायुतीच्या नेत्यांना भेटून त्यांनी उमेदवारांच्या विजयासाठी समन्वय बैठका घेतल्या.
ठाणे आणि कल्याण हे तर शिवसेना शिंदे गटाचे बालेकिल्ले... ठाण्यात नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजपकडून जोरदार विरोध झाला. तर कल्याणमध्येही भाजपमुळं मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्यामुळं ठाणे आणि कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठाच पणाला लागलीय. तर दक्षिण मुंबईत यामिनी जाधव आणि उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उमेदवारांची नौका पार करण्यासाठी मुख्यमंत्री पडद्याआडून सूत्रं हलवत आहेत. शिवसेना शिंदे गट लढवत असलेल्या १५ पैकी १३ जागांवर त्यांचा सामना थेट शिवसेना ठाकरे गटाशी होणार आहे. धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा हा थेट सामना आहे. हा सामना जिंकून मुख्यमंत्री शिंदे सामनावीर ठरणार का? याकडं आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
दरम्यान, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण, मावळ, नाशिक, शिर्डी, हातकणंगले, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा आणि औरंगाबाद या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत असणार आहे. त्यामुळे आता बाजी कोण मारणार? आणि कोणाच्या गळ्यात खरी पक्षाची माळ पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.