वारी 2021 : संत श्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचं गुरुवारी प्रस्थान

पावसाळा सुरू झाला की वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागतात

Updated: Jun 23, 2021, 10:39 AM IST
वारी 2021 :  संत श्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचं गुरुवारी प्रस्थान title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे गुरुवारी  ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस त्र्यंबकेश्वरातून प्रस्थान होणारये . ज्ञानेश्वरांचे गुरुबंधू आणि नवनाथांपैकी एक असलेल्या निवृत्तीनाथांचे समाधी मंदिर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वरात आहे. या समाधी मंदिरापासून प्रस्थान होणाऱ्या या पालखीला सर्व पालख्यांमध्ये मानाचे स्थान आहे. दिंडीचालक वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रस्थान सोहळ्याची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आलीये . संस्थानच्या पालखीसोबत चालणाऱ्या दिंड्यांमधील प्रत्येकी एका प्रतिनिधीस प्रस्थान पालखीसोबत सामावून घेण्यात येणार आहे ..

पावसाळा सुरू झाला की वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागतात . दरवर्षी आषाढ़ी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते . परंतु कोविड महामारीमुळे राज्यशासनाने वारीसाठी अनेक निबंध घातल्याने सलग दुसऱ्या वर्षीही संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शिवशाही बसने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे .

याबाबत माहिती देण्यासाठी संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर ट्रस्ट कार्यालयात पत्रकार परिषदेत वारी प्रस्थान कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यात आली . राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड -१ ९ चे नियम पाळून होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यात पारंपरिक पूजाविधी होणार आहेत . साहाय्यक धर्मादाय आयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर पालखी प्रस्थान ठेवणार आहे . तत्पूर्वी भजन , व महाप्रसाद असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे .