महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 26, 2024, 06:57 AM IST
महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट title=
Weather Update maharashtra IMD predicts heavy rainfall over the next few days in maharashtra states

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर 27 जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचा आंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 25-27 जुलैपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसणार आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 

गुरुवारी 25 जुलैरोजी मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. पुण्यात अवघ्या काही तास झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगेने धोका पातळी ओलांडली होती. त्यामुळं नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. तर, कल्याणमध्येही उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडल्याने शहरात नदीचे पाणी शिरले होते. आजही हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. 

25 जुलै ते 27 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आजही हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. 27 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मुंबईत आज मुसळधार

मुंबईत आजही  मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईत रात्रभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असून सकाळी चार वाजेपासून पावसाची उसंत घेतली आहे. त्यामुळं रस्ते वाहतूक सुरळीत असून मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे. 

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

रेड अलर्टः रायगड, रत्नागिरी, सातारा
ऑरेंज अलर्टः पुणे, सिंधुदुर्ग कोल्हापूर,मुंबई, ठाणे, पालघर
यलो अलर्टः मराठवाड्यासह इतर जिल्हे

मुंबईतील शाळा सुरूच राहणार

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै २०२४ रोजी नियमितपणे सुरू राहणार आहेत, अशी माहिती पालिकेने दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय पालकांनी शाळा, महाविद्यालयांच्या सुटीसंदर्भातील अन्य कोणत्याही माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.