AC लोकलमध्ये TC ला मारहाण: शर्ट फाडला, हात फ्रॅक्चर केला तरी तिघांना सोडलं कारण...

Western Railway TC Attacked: प्रवाशांनी केलेल्या मारहाणीमध्ये या टीसीच्या हाताला दुखापत झाली असून त्याचं शर्टही या प्रवाशांनी मारहाणीमध्ये फाडलं. तरीही या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. यामागील कारण जाणून घ्या

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 18, 2024, 04:15 PM IST
AC लोकलमध्ये TC ला मारहाण: शर्ट फाडला, हात फ्रॅक्चर केला तरी तिघांना सोडलं कारण... title=
टीसीला मारहाण झाल्यानंतरच पश्चिम रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण

Western Railway TC Attacked: मुंबईमधील उपगनरीय एसी लोकल ट्रेनमध्ये टीसीला झालेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 15 ऑगस्ट रोजी एसी लोकलमध्ये तिकीट तपासण्यावरुन काही प्रवाशांनी टीसीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी पश्चिम रेल्वेने यासंदर्भातील स्पष्टीकरण देताना मारहाण करणाऱ्या प्रवाशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याची टीसीबरोबर बाचाबाची झाली आणि यातूनच प्रकरण मारहाणीपर्यंत गेल्याचं पश्चिम रेल्वेने अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) हॅण्डलवरुन शेअर केलेल्या मारहाण करणाऱ्या प्रवाशाने लिहिलेल्या माफीनाम्याचा संदर्भ देत म्हटलं आहे. तसेच टीसीला मारहाण करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही कारवाई न करता का सोडून देण्यात आलं हे ही पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे.

व्हायरल व्हिडीओत काय?

मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमधील टीसी आणि प्रवाशात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार तिकीटाचे पैसे मागितल्यानं प्रवाशानं चक्क टीसीला मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. टीसी जसबीर सिंग तिकीट तपासत असताना त्यांना एसी लोकल ट्रेनमध्ये 3 प्रवासी फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी दंड भरण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात राडा झाला.

अनिकेत भोसले या प्रवासाने टीसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडीओत ऐकू येत आहे की तो आपण कुटुंबासह प्रवास करत असल्याचे सांगत आहे. तसंच आपण ओळखपत्र मागितले असता दाखवले नाही असा दावा व्हिडीओत केला. 

नेमकं काय म्हटलंय पश्चिम रेल्वेने?

"व्हायरल व्हिडीओमध्ये तिकीट तपासणीस जसबीर सिंग यांच्याबरोबर गैरवर्तवणुकीसाठी करणाऱ्या प्रवाशाने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण केलेल्या गैरवर्तवणुकीसाठी मारहाण करणाऱ्या प्रवाशाने जसबीर सिंग यांची बिनशर्त माफी मागितली आहे," असं पश्चिम रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, "सर्व प्रवाशांना आव्हान करु इच्छितो की रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी सहकार्य करा," असंही पोस्टमध्ये पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे. "रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर कोणत्याही प्रकारची गैरवर्तवणूक करणे केवळ नैतिक दृष्ट्या चुकीचं नसून हा दंडनीय गुन्हा आहे," अशी आठवणही पश्चिम रेल्वेने करुन दिली आहे. प्रवाशांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये जसबीर सिंग यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांचं शर्टही फाडण्यात आल्याचं 'टाइम्स नाऊ'ने म्हटलं आहे.

माफीनाम्यात प्रवाशाने काय म्हटलं आहे?

"मी अनिकेत अशोक भोसले, आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी 94051 एसी लोकलने 1509 या तिकीट नंबरने अंधेरीवरुन ट्रेनमध्ये विरारला जाण्यासाठी चढलो. बोरिवली स्टेशनआधी आणि अंधेरी बोरीवलीदरम्यान तिकीट तपासणीस तकीट चेक करत होते. त्यावेळेस तिकीट तपासणीस जसबीर सिंग हे इतर कोणत्यातरी प्रवाशाचं तिकीट तपासत असताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळेस मी दोघांमधील वाद मिटवण्याच्या उद्देशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझी जसबीर सिंग यांच्याबरोबर बाचाबाची झाली. कर्तव्यावर असताना म्हणजेच ऑन ड्युटी असताना जसबीर सिंग यांच्याबरोबर मी अशी वागणूक करणं अपेक्षित नव्हतं. मी असं करायला नको होतं. जे घडलं त्याबद्दल मला खेद आहे. मी जे काही केलं आहे त्यासाठी माफी मागतो. मी भविष्यात अशा पद्धतीचं वर्तन करणार नाही. मला जसबीर सिंग यांच्याबद्दल मनात कोणताही द्वेष नाही. तसेच त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात यावी अशीही माजी मागणी नाही. मी केलेल्या या वागणुकीसाठी मला माफ करावे," असं या पत्रात म्हटलं आहे.

...म्हणून कारवाई न करता सोडून दिलं

"हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी घडला आहे. या प्रकरणामध्ये एसीने प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांकडे फर्स्ट क्लासचं तिकीट असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना प्रवास भाडं आणि दंड भरण्यास सांगण्यात आलं. टीसी आणि प्रवाशांमध्ये ही चर्चा सुरु असतानाच या प्रकरणाशी संबंध नसणारे तीन अन्य प्रवाशी तेथे आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी टीसीबरोबर गैरवर्तन केलं. आरपीएफ, जीआरपीला पाचारण करण्यात आलं. त्यांना पाहून मारहाण करणाऱ्या तिन्ही प्रवाशांनी बिनशर्त लेखी माफी मागण्याची तयारी दर्शवली. म्हणून त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आलं," असं स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेने दिलं आहे.

 

पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी सहकार्य करावे असं आवाहन करणारा व्हिडीओही पश्चिम रेल्वेने या पोस्टमध्ये शेअर केला आहे.