पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका

सलग तिसऱ्या वर्षीही....   

Updated: Aug 12, 2020, 01:22 PM IST
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: विदर्भातील संत्र्याला साता समुद्रापार मागणी आहे. कोरोना सारख्या आजारात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संत्र्याचा जूस पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. परंतु या वर्षी मात्र या विदर्भातील संत्र्याने मात्र शेतकऱ्यांना कोरोना पेक्षाही मोठ्या संकटात टाकलं आहे. 

हिरवाईने नटलेला हा संत्र्याच्या बगीचा. पण याच बगिच्यातील मातीवर नजर टाकली तर दिसतो तो फक्त संत्रा सडा. कोट्यवधी रुपयांच्या संत्र फळाला लागलेलं हे ग्रहण आणि त्यापेक्षा ही ग्रहनाने चिंतेत पडलेले हे अमरावतीच्या मोझरीतील संत्रा उत्पादक शेतकरी दिनेश उमप. दिनेश उमप यांच्याकडे संत्र्यांची २०० ची झाडे आहेत. पण, मागील चार वर्षांपासून होत असलेल्या वातावरणातील बदलांमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या रोगामुळे हजारो हेक्टर वरील संत्र बागा धोक्यात आल्या आहेत. 

परिणामी लाखो आणि करोडो रुपयांच्या संत्र्यांचा रस हा शेतातच झिरपत आहे. संत्र गळतीचा हा भोग केवळ या वर्षीचा नाही तर मागील चार वर्षांपासून संत्र उत्पादक शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, संत्र गळतीवर उपाय सुचवण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ पावलं उचलून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी संत्र उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे. यात पश्चिम विदर्भात ५५ हजार हेक्टरवर संत्र उत्पादन घेतलं जातं. पण सतत बदलत असलेल्या हवामानाचा संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. आणि याचाच फटका हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. सध्या अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतात संत्राचा आंबिया बहार फुललेला आहे. साधारणत: दिवाळीच्या दरम्यान हा संत्रा बाजारपेठ उपलब्ध होत असतो. परंतु मागील तीन वर्षांपासून वातवरनात होणारे बदल कमी जास्त पाऊस व विविध रोगांचा होणारा प्रादुर्भाव या मूळे झाडांवरील संत्री ही गळून पडत असल्याने संत्रा बगीचे खाली होत आहे.