कोल्हापूर : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर जयप्रभा स्टुडिओमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात यावर अशी मागणी होत आहे. तर चित्रपट कलाकारांनी स्टुडिओचे जतन करून येथे चित्रीकरण केले जावे अशी मागणी पुढे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. हे प्रकरण सत्र न्यायालयात प्रलंबित आहे असे असतानाही चित्रपट कलाकारांनी जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे अशी भूमिका घेत आंदोलन सुरु केले आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नेतृत्वाखाली हे कलाकार आंदोलन करत आहेत. आज तर या आंदोलकांनी पंचगंगा नदीपात्रात उतरत पाण्यात उभे राहून अर्धनग्न आंदोलन केले.
आक्रमक आंदोलकांनी सुरुवातीला पंचगंगा घाटावर जयप्रभा बचावच्या घोषणा देत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर लगेचच आंदोलक पंचगंगा नदी पात्रात जाऊन पाण्यात अर्धनग्न उभा राहून लक्षवेधी आंदोलन केलं.
यावेळी आंदोलकांच्या हातातील फलक बोलके होते. नदीपात्रात उभे राहून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर जयप्रभा स्टुडीओ बचावाच्या घोषणा दिल्या. या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त परिसरात तैनात केला होता. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेच्यावतीने पंचगंगा नदी पात्रात फिरत्या बोटी ठेवण्यात आल्या होत्या.