नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा 'तो' मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा 'लेटर बॉम्ब'मुळे खळबळ

आरोग्य खात्यात मोठा घोटाळा झाला आहे. निलंबित आरोग्य अधिका-यानं लेटर बॉम्बच्या माध्यमानं थेट मंत्र्यावरच गंभीर आरोप केले आहेत.

Updated: May 26, 2024, 11:13 PM IST
नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा 'तो' मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा 'लेटर बॉम्ब'मुळे खळबळ title=

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केलेत... त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 

निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून संबंधित मंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडालीय.संबंधित मंत्र्यांनी कात्रजच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं आणि खरेदीसाठी दबाव आणला होता...मात्र, नियमबाह्य कामात मदत न केल्याने निलंबित केल्याचा आरोप भगवान पवार यांनी केलाय... दरम्यान, राज्यात शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांनी भगवान पवार यांची महापालिका आरोग्य प्रमुखपदावर नियुक्ती केली होती. निलंबनाच्या कारवाईनंतर भगवान पवार यांनी लेटर बाँब टाकत मंत्र्यांचं नाव न घेता गंभीर आरोप केलेत. 

पत्रात नेमकं काय आहे? 

माननीय मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करण्यास दबाव आणला होता. परंतु मी नियमबाह्य कामात मदत केलेली नाही. तर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं. माझ्यावर अन्याय झाला असून, माझे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी भगवान पवार या आरोग्य अधिका-यानं केलीय..

या लेटर बॉम्बमध्ये भगवान पवारनं संबंधित मंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळं तो मंत्री नेमका कोण? असा सवाल उपस्थित होतोय. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी यानिमित्तानं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधलाय..

नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणा-या या मंत्र्याला मुख्यमंत्री शिंदे अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा सवाल रोहित पवारांनी शिंदेंना विचारलाय. तर दुसरीकडं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही सरकारवर टीकेचा भडीमार केलाय.  भगवान पवारवर निलंबनाची कारवाई झाल्यानं त्यांनी आता थेट मंत्र्यावर आरोप केलेत. त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे, याची शहानिशा सरकारनं करावी. मात्र आरोग्य खात्यात आलबेल नाही, एवढं मात्र यानिमित्तानं समोर आलंय.