अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : सरल पोर्टलवर फक्त ब्राह्मण जातीचा उल्लेख का? असा प्रश्न ब्राम्हण सेवा संघानं उपस्थित केलाय. पोर्टलवर 'ब्राह्मण किंवा इतर' असे दोनच पर्याय आहेत. पोर्टलवरील बदलामुळे शासनाकडूनच भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रश्नावरुन ब्राम्हण सेवा संघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र देखील लिहीलय. शासनाच्या सरल पोर्टलवर शालेय विद्यार्थ्यांची माहिती भरुन घेतली जाते.
पुर्वी ही माहिती भरुन घेत असताना जात हा उल्लेख तिथे होता. जातीच्या रखान्यात विद्यार्थ्यांची जात लिहीली जायची. आता मात्र जात लिहीताना विद्यार्थ्यांसमोर ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तर असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसमोर येतात. त्यामुळे ब्राम्हण ही एकच जात आहे का ? असा प्रश्न ब्राम्हण सेवा संघाने उपस्थित केलाय.
सरकारची यामागची भूमिका शंकास्पद आणि अस्पष्ट असल्याचेही ब्राम्हण सेवा संघानं म्हटलंय. सरकारला यातून ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तर असा वाद निर्माण करायचाय का ? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे सरल पोर्टलवरुन तात्काळ यात सुधारणा करुन हे पर्याय काढावे आणि जात या रखान्यासमोर संबंधित विद्यार्थ्यांस जात लिहिण्याचा पर्याय द्यावा असे ब्राम्हण सेवा संघाने म्हटलंय.