कारवाईच्या भीतीने रिक्षा चालकाने पोलिसाला पळवले, असा घडला प्रसंग

पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षा चालकाकडून पळवून नेण्याचा प्रयत्न

Updated: Dec 18, 2020, 08:59 AM IST

जळगाव : रिक्षा (Rikshaw) पोलीस स्थानकात (Police Station) नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला  रिक्षा चालकाने पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने मोठी खळबळ उडालीय.पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना नियम तोडणारा एका रिक्षा चालक त्यांच्या नजरेत आला. त्यावेळी थांबा नसलेल्या ठिकाणी रिक्षा का लावली ? असा प्रश्न पोलिसांनी विचारला. नियमात वागून रिक्षा बाजुला करण्यापेक्षा रिक्षा चालकाने पोलिस कर्मचाऱ्यास उलटसुलट उत्तर द्यायला सुरुवात केली. जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाशी सुरुवातीला रिक्षा चालकाची बाचाबाची झाली. 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तसेच पुढील कारवाईसाठी रिक्षा चालकाला पोलीस स्थानकात नेण्याचे ठरले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने रिक्षावाल्याला रिक्षा पोलीस स्थानकात घेऊन जायला सांगितलं. आणि इथून धक्कादायक प्रसंगाला सुरुवात झाली.

पोलीस रिक्षात बसले आणि रिक्षा सुरु झाली. पण रिक्षा चालकाने आपली रिक्षा वाहतूक शाखेत न नेता सिंधी कॉलनी रस्त्याने आपल्या घराकडे रिक्षा नेण्यास सुरुवात केली. यादरम्यान रिक्षा पलटी झाली आणि रिक्षा चालकाला दुखापतही झाली. 

या सर्व घटनेचं चित्रीकरण पोलिसांनी आपल्या कॅमेरात केलं. सध्या रिक्षा चालकावर उपचार सुरू आहेत. या घटनेत रिक्षा चालकाच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.