रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये एक दिवसाच्या बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तात्काळ शोध घेत बाळ चोरणाऱ्या संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.
नर्स असल्याचे भासवून स्वाती माने या महिलेने सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील नवजात शिशु सरस्वती हॉस्पिटल मधून एक दिवसाच्या बाळाला पळवून नेले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली होते. सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी या महिलेला भवानीनगर मधून ताब्यात घेतला आहे. ही महिला मुळची सोलापूर जिल्ह्यातील असून अन्य ठिकाणी अगोदर काम केलं आहे.
बाळाचं अपहरण करणारी महिला हॉस्पिटलमध्ये दोन ते तीन दिवसांपासून आपण नर्स असल्याचं भासवून कामाला लागली होती, तिनंच बाळाचं अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एक दिवसाच्या बाळाला महिलेने पिशवीमध्ये टाकून पलायन केल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आलं आहे.
अवघ्या एका दिवसाच्या बाळाचं अपहरण झाल्याने हॉस्पिटलमध्ये मोठी खळबळ उडाली होती. रविवारी सकाळी आठच्या वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता.
तासगाव मधील सिध्देश्वर चौकातील डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यात एक महिला प्रसूत झाली. सकाळी एक महिला नर्स असल्याचे भासवून सबंधित महिलेच्या वॉर्डमध्ये गेली. तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या बॅगमध्ये टाकले. या बालकाला घेऊन महिलेने क्षणार्धात पलायन केले. या घटनेने हॉस्पिटलसह शहरात खळबळ उडाली होती.
मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासांमध्येच महिलेला ताब्यात घेतलं आहे. तसेच बाळही सुखरुप आहे.