close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भंगार वेचून उदरनिर्वाह करणारी अकरा मुलांची आई सतराव्यांदा गर्भवती

एक महिला सतराव्या वेळी गर्भवती असल्याचे समोर आले आहे 

Updated: Sep 10, 2019, 07:57 PM IST
भंगार वेचून उदरनिर्वाह करणारी अकरा मुलांची आई सतराव्यांदा गर्भवती

लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : एकीकडे राज्य आणि केंद्र सरकार वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असताना दुसरीकडे एक महिला सतराव्या वेळी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. माजलगाव तालुक्यातील ही महिला तब्बल सतराव्या वेळेस गर्भवती असून तिला अकरा आपत्य असल्याचे समोर आले आहे. या महिलेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी सज्ज झाले असून या प्रकाराने आरोग्य विभाग देखील खडबडून जागा झाला आहे.

या महिलेचे नाव लंकाबाई असून त्या पालावर राहून भंगार वेचून उदरनिर्वाह करतात. त्या तब्बल सतराव्या वेळी गर्भवती राहिल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. बीडच्या माजलगाव येथील केसापुरी कॅम्प येथे या वास्तव्यास आहेत. ही घटना समजतात आरोग्य विभागाचे एक पथक महिलेच्या पालावर दाखल झाले आहे.

माजलगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर केसापुरी वसाहत परिसरात मालोजी खरात हे पालठोकून वास्तव्य करीत आहेत. त्यांची पत्नी लंकाबाई सतराव्यांदा आठ महिन्याच्या गरोदर आहेत. लंकाबाई यांना अगोदर नऊ मुली, दोन मुलं असे ११ अपत्य असून यापूर्वी सहा आपत्य बाळंतपण झाल्यानंतर दगावली आहेत. यानंतरही त्या आता सतराव्यांदा गरोदर आहेत. आरोग्य पथकाने त्यांच्या रक्ताच्या तपसण्या, सोनोग्राफी तपासणी केली असता सर्व रिपोर्ट सकारात्मक असले तरी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात पोहोचल्याचा डंका सरकार कडून वाजविण्यात येत असला तरी माजलगावच्या या घटनेकडे पाहून आरोग्य यंत्रणेच पितळ उघडे पडले आहे. १७ व्या वेळी गरोदर असताना सदर महिलेची वेळीच चौकशी करून तिला कुटुंब नियोजनासाठी का परावृत्त करण्यात आले नाही. असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येतोय. एकीकडे 'हम दो हमारे दो किंवा हमारा एक' अशी मानसिकता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना माजलगाव तालुक्यातील एक महिला मात्र एक नव्हे दोन नव्हे तर सतराव्या वेळी गर्भवती असल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकाराने आरोग्य यंत्रणा देखील हबकून गेली आहे.