लेखिका आयदानकार उर्मिला पवार यांना 'हा' मानाचा जीवनगौरव पुरस्कार

स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रगण्य प्रसिद्ध लेखिका आयदानकार (AAYDAAN) उर्मिला पवार (Urmila Pawar) यांना आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार (A S  Shevare Lifetime Achievement Award) जाहीर झाला आहे.  

Updated: Oct 27, 2021, 07:54 AM IST
लेखिका आयदानकार उर्मिला पवार यांना 'हा' मानाचा जीवनगौरव पुरस्कार

मुंबई :  Shevare Lifetime Achievement Award : स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रगण्य प्रसिद्ध लेखिका आयदानकार (AAYDAAN) उर्मिला पवार (Urmila Pawar) यांना आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार (A S  Shevare Lifetime Achievement Award) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वाङमयीन परिवर्तनवादी चळवळीत अग्रेसर आणि सातत्यपूर्ण रचनात्मक कार्यक्रम करून मराठी वाङमयीन क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्‍या सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेतर्फे दिला जातो.

अलिकडेच आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावर्षीचा पुरस्कार लेखिका आयदानकार उर्मिला पवार यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये, सन्मानपत्र, शाल आणि सन्मानचिन्ह असे आहे. शेवरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनी झालेल्या कार्यकारिणी सभेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

परिवर्तनवादी कवितेचे जनक आ. सो. शेवरे यांचे 26 ऑक्टोबर 2016 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी वाङमयीन आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या एका साहित्यिकाला आ. सो. शेवरे यांच्या नावे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. हे कार्य सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या संस्थेने सुरु केले आहे. यापूर्वी आंबेडकरवादी विचारवंत, कुशल नेतृत्वगुण असणारे, दलित पॅंथरचे संस्थापक, नेते राजा ढाले, ज. वी. पवार यांना हा पुरस्कार शेवरेंच्या स्मृतीदिनी घोषित करण्यात आला होता. 

आ. सो. शेवरे यांचे कोकणातील विद्रोही, पुरोगामी वाङमयीन व सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. आंबेडकरी चळवळीचा प्रचार आणि प्रसार करताना नवी पालवी बहरूनी यावी या ध्येयापोटी त्यांनी 'प्रसंवाद' या अनियतकालिकाची निर्मिती केली. याद्वारे त्यांनी नव्या लिहित्या हातांतील उपजत कौशल्य ओळखून त्याला प्रसंवाद अनियतकालिकात संधी दिली. त्य‍ानंतर सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना केली.

वाङमयीन कार्यक्रमांना आंबेडकरी अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांचे 'गंधारीची फुले', 'दफनवेणा' व 'झीरो बॅलन्स असलेलं माझं पासबुक' आदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. वाङमयीन क्षेत्र‍ातील बा. सी. मर्ढेकर, श्रीपाद काळे आणि अस्मितादर्श या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच हेतकर्स पब्लिकेशनद्वारे त्यांच्या समग्र वाङमयीन वाटचाल आणि चरित्रपर 'आ. सो. शेवरे: व्यक्ती आणि वाङमय' हा सुनील हेतकर संपादित महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. शेवरेंनी केलेल्या कार्याच्या स्मृती जतन व्हाव्यात, म्हणून हा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.  

उर्मिला पवार यांचे साहित्य

 Dalit woman writer Urmila Pawar : स्त्रीमुक्ती चळवळीतील लेखिका अशी उर्मिला पवार यांची ओळख आहे. 'सहावं बोट' (1988), 'चौथी भिंत' (1989) व 'हातचा एक' (2004) आदी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित कथा 'उदान' (1989) या भाषातंराने त्यांना नावलौकिक मिळवून दिला. आंबेडकरी चळवळीत स्त्रियांनी दिलेल्या योगदानाविषयी 'आम्हीही इतिहास घडविला' (1989) या संशोधनपर लेखनाशिवाय 'मॉरिशस एक प्रवास' (1994) हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध आहे. 'आयदान' (2003) हे आत्मकथन मैलाचा दगड ठरले. या आत्मकथनाचे इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलुगू भाषेत अनुवाद झाले आहेत. शिवाय महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही याचा समावेश करण्यात आला आहे.

'दलित लेखिका आणि त्याचं साहित्य' (2010) आणि 'कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते इ. महत्त्वपूर्ण ग्रंथही प्रसिद्ध आहेत. यातील बहुतेक साहित्यकृतींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. 'सहावं बोट' (1989) या कथासंग्रहाला प्राप्त झालेला साहित्य संस्कृती मंडळाचा शासकीय पुरस्कार 2015 मध्ये त्य‍ांनी शासनाला परत केला. त्यांना संगमनेर, चंद्रपूर, धुळे येथे संपन्न झालेल्या साहित्यसंमेलानचे अध्यक्ष पदही भूषविले आहे. या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना लवकरच सन्मानित करण्यात येईल अशी माहिती संस्थाध्यक्ष सुनील हेतकर, कार्यवाह सिद्धार्थ तांबे यांनी दिली.