श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : मराठा समाजाच्या खुल्या प्रवर्गातील नोंदींच्या अनुषंगानं हाती घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या (Maratha Reservation Survey) कामाला राज्यभरात वेग आलेला असतानाच या प्रक्रियेदरम्यान प्रगणकांना येणारे विचित्र अनुभव लक्ष वेधत आहेत.
कुठं जात विचारली म्हणून संतापणारे नागरिक तर, कुठं नेमकं कशाचं सर्वेक्षण सुरु आहे याचीच कल्पना नसल्यामुळं द्विधा मनस्थितत असणार नागरिक अशीच एकंदर परिस्थिती आहे. या साऱ्यामध्ये काही तांत्रिक अडचणींचाही प्रगणकांवर ताण येताना दिसत आहे. त्यातच अनेक ठिकाणी त्यांना सामाजिक रोषाचाही सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना नुकतीच यवतमाळमध्ये घडली असून या गंभीर प्रकरणानं शासनाचंही लक्ष वेधलं आहे.
यवतमाळमध्ये मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी प्रशासनामार्फत सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान प्रगणक म्हणून नेमण्यात आलेल्या दोन शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यवतमाळ शहरातील जिजाऊ नगर भागात हा गंभीर प्रकार घडला असून, आरोपीनं महापुरुषांनासुद्धा अश्लील शिवीगाळ केल्याने संताप व्यक्त होत आहे.
घडल्या प्रकरणी संदीप पत्रे आणि अमोल बाबरे या शिक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. तसंच सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना पोलीस संरक्षण देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
काय म्हणतात उपमुख्यमंत्री फडणवीस?
मराठा आरक्षणाच्या धर्तीवर कुणबी दाखल्यांसंदर्भातल्या जीआरबाबत मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. असं असतानाच कुणबी दाखल्यासंदर्भात नव्या जीआरमध्ये गरज भासल्यास बदल करण्यात येईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भुजबळ जे आक्षेप घेतील त्याबाबत सुधारणा करून त्यात बदल केला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं. भाजप सत्तेत आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.