'या' शाळेत कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा (व्हिडीओ)

Updated: Mar 3, 2020, 11:10 PM IST

यवतमाळ : कॉपीमुक्त वातावरणात दहावीच्या परीक्षा होत असल्याचा दावा शिक्षण विभाग करीत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात वेगळं चित्र आहे. महागाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा बघायला मिळत आहे. बारावीच्या परीक्षेत असाच धुमाकूळ घातल्यानंतर आज दहावीच्या पहिल्याच पेपरला तेच  चित्र बघायला मिळालं. 

परीक्षार्थींच्या हातात पेपर पडल्यानंतर अवघ्या १५ मिनिटात व्हाट्स अपद्वारे पेपर बाहेर पडला. खिडकी, शाळा इमारतीवर चढून कॉपी पुरविण्याऱ्यांची धडपड सुरु झाली. या गोंगाटाचा गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. शिक्षण विभाग मात्र परीक्षा शांत आणि कॉपीमुक्त वातावरणात होत असल्याचा दावा करतंय.

दहावीचा पेपर फुटला 

जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दरांच्या हातात व्हॉट्स ऍपवर मराठीचा पेपर दिसून आला. केंद्र प्रमुखांनी याप्रकरणी हेतूपुरस्सर दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे. शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांच्या आदेशाला केंद्र प्रमुखांनी केराची टोपली दाखवली.

शाळेचं नाव मोठं करण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर या केंद्रावर काही शिक्षकांचे पाल्य दहावीची परीक्षा देत आहेत. त्या विद्यार्थ्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याचं इथं दिसून येत आहे.