ठाणे : कारागृहाविषयी सर्वसामान्यात एक भिती असते. तसेच एक सुप्त आकर्षणही असते. नेमकी हीच उत्सुकता लक्षात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृहात 'फील द जेल' हा आगळावेगळा उपक्रम राबवला जातोय. तुम्हाला एक दिवस कैदी होऊन तुरुंगवास अनुभवता येईल.
- तुम्हीही होऊ शकता एक दिवसाचे कैदी
- जेलमधलं जीवन एक दिवस अनुभवू शकता
- ठाणे कारागृहात जेल टुरीझम, 'फील द जेल' हा उपक्रम
राज्याचे विशेष पोलीस महानिरिक्षक राज्यवर्धन सिन्हा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी दोन महिन्यांपूर्वी हैदराबादच्या संगारेड्डी या कारागृहाला भेट दिली. ठाणे, रत्नागिरी आणि सावंतवाडी इथली कारागृह ऐतिहासीक असल्याने या तीन ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
एक दिवसाचं कैदी झाल्यामुळे तुम्हाला तुरूंगातलं जीवन अनुभवता येईल. कैद्यांची दिनचर्या समजावून घेता येईल. कैद्यांचे कपडे, बिछाना, ताटवाटी, कारागृहातले जेवण अनुभवता येईल. त्याशिवाय तुम्हाला एक दिवस तुरूंगात बंदिस्त करणार आहेत.
ठाणे कारागृहात फाशीयार्डही आहे. हे पाहण्याची संधीही तुम्हाला मिळेल. या उपक्रमासाठी कारागृहात वेगळा विभाग केला जाईल. हा अनुभव घेण्यासाठी काही पैसे तुम्हाला मोजावे लागतील. हा अनुभव घेण्यासाठी तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणं गरजेचं आहे. कैद्यांच्या जीवनाव्यतिरिक्त या प्रत्येक जेलला स्वतःचा एक इतिहास आहे. त्या ऐतिहासिक इमारतीत तो इतिहास अनुभवण्याची संधीही मिळेल.