Nana Patole: काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदापासून मुक्त करण्याची विनंती मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये येत्या काळात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यात विधानसभा निवडणूक लढवली. शंभरहून अधिक जागा लढवणा-या काँग्रेसला केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसच्या पिछेहाटीला जबाबदार धरुन नानांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागली होती.
लोकसभेच्या निकालानंतर जोमात आलेली कॉग्रेस विधानसभा निकालानंतर पुन्हा एकदा कोमात गेली. धक्कादायक निकाल आणि कॉग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. या निकालानंतर कॉग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी कॉग्रेसच्याच अंतर्गत वर्तृळातून जोर धरू लागली. सध्याचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता स्वत:हूनच मल्लिकार्जुन खर्गेंना ईमेल करत आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
एकंदरीतच कॉग्रेस सध्या भाकरी फिरवण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासेबतच कार्यकारणीतही मोठे बदल दिसू शकतात
सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.नव्या आणि तरुण चेह-यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षांसोबतच काँग्रेसची सध्याची कार्यकारिणीही बरखास्त केली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसमध्ये नव्यानं संघटना बांधणी होणारएकंदरीतच विधानसभेत जागावाटपात झालेल्या चुका, फसलेली निवडणूक रणनीती आणि अतिआत्मविश्वास याचाच फटका काँग्रेसला बसला का, यावर बरंच मंथन करून झालंय. आता नव्यानं निवडणुकांना सामोरं जातांना काँग्रेसला नव्या चेह-यांसह नवी भूमिका घेऊन पुढे जावं लागणार आहे. त्यामुळे आता भविष्यकाळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळून आलाय. काँग्रेसच्या दारूण पराभवनंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसच्याच नेत्यांनी निशाणा साधलाय. नाना पटोले हे RSSचे एजंट आहेत. पटोलेंनी पैसे घेऊन तिकीटं वाटली, असे गंभीर आरोप काँग्रेसचे नागपुरातील पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी केलेत. पटोले यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही शेळकेंनी दिलाय.या खळबळजनक आरोपांनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी चक्क बंटी शेळकेंचच कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. बंटी शेळके लढवय्ये नेते आहेत. आरएसएसच्या गडात ते खिंड लढवताहेत अशा शब्दात वडेट्टीवारांनी बंटी शेळके यांचं कौतुक केलंय. विधानसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवाचं खापर नाना पटोले यांच्या माथी फोडलं जातंय. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत नाना पटोले हटाव मोहीम राबवली जात असल्याचं बोललं जातंय. निवडणुकीत काही चुका झाल्या असून त्या हायकमांडच्या कानावर टाकण्यात आल्या, असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. मात्र या मोहीमेत आपला सहभाग नाही, हे सांगण्यासही वडेट्टीवार विसरले नाहीत.नाना पटोले यांनी मात्र ह्या सर्व आरोपांवर फारसं बोलणं टाळलंय. तो पक्षाचा विषय आहे. त्यावर योग्य ठिकाणी स्पष्टीकरण देईन, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.