अमर काणे, झी मीडिया, नागपूर : लग्नात डीजेवर नाचताना झालेल्या वादातून लग्न मंडपात निखिल लोखंडे नावाच्या 26 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. तर हाणामारीत इतर चौघे गंभीर जखमी झाले. जुना कामठी रोडवरील अमन सेलिब्रेशन लॉन मध्ये काल रात्री हा थरार घडला. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपीना अटक केली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारी रात्री जुन्या कामठी मार्गावरील हे अमन सेलीब्रेशन लॉन या ठिकाणी गणेश नंदनवार आणि नम्रता करूडकर या वर - वधू चा लग्न सोहळा थाटामाटात सुरू होता. डीजेच्या तालावर तरुण मंडळी नाचत होती.नाचताना वधू आणि वर पक्षातील लोकांना एकमेकांना धक्का बसला. या क्षुल्लक कारणावरून काही तरुणांमध्ये वाद सुरू झाले आणि निखिल लोखंडे या वधू पक्षातील पाहुण्याला मारहाण करण्यात आली. लग्नात अरिष्ट नको म्हणून थोरल्या मंडळीने समजूत घातली. त्यामुळे तेव्हा वाद निवळलला.
पुढे वाद वाढू नये म्हणून वधू पक्षाकडून निखिल लोखंडेला घरी पाठवले. मात्र वर पक्षाकडून लग्नात पाहुणे म्हणून आलेल्या काही गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांच्या मनात काही वेगळेच होते. त्यांनी बाहेरून आणखी तरुणांना लग्नस्थळी बोलावले.. धारदार हत्यारं गोळा केली. काही वेळाने निखिल लोखंडे पुन्हा लग्न स्थळी दाखल झाला. आणि त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या वर पक्षातील काही तरुणांनी धारधार शस्त्राने हल्ला केला.
जीव वाचवण्यासाठी निखिल ने लॉन च्या आत धाव घेतली. लग्न सोहळा आटोपता आला असताना वधू ला तिच्या कुटुंबियांकडून निरोप दिला जात असताना अचानक जखमी निखिलच्या मागे हातात धारधार शस्त्र घेऊन धावणारे आरोपी तरुण पाहून लग्न मंडपात धावपळ उडाली. लोकं काही करू शकतील त्याआधीच आरोपींनी निखिल ची हत्या केली.
या हाणामारीत आणखी चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान एकदा घरी गेलेला निखिल पुन्हा लग्न स्थळी का परत आला ? त्याला कोणी कट करून परत बोलावले का ? आणि त्यानंतरच त्याची हत्या झाली का ? असा संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपीना अटक करुन त्या दिशेने तपास सुरू केला आहे.