विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीड जिल्ह्यात सध्या एका अनोख्या प्रेमकहाणीची चांगलीच चर्चा रंगली आहे. याला कारणही तसंच आहे. बीड जिल्ह्यातल्या एका तरुणाचा तृतीयपंथीयावर जीव जडला आणि दोघांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. 6 मार्चला हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत.
बाळू-सपनाची प्रेमकहाणी
बीड जिल्ह्यातल्या माळापूरी गावात राहाणारा बाळू तोडमल हा तरुण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात ढोलकी वाजवतो. एका कार्यक्रमात बाळूची ओळख तृतीयपंथी सपनाशी झाली. आणि इथूनच या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. पहिल्याच भेटीत तृतीयपंथी असलेल्या सपनावर बाळूचा जीव जडला आणि त्याने थेट सपनाला लग्नाची मागणी घातली.
पहिल्यांदा सपनाने दिला होता नकार
पहिल्यांदा सपनाने बाळूला नकार दिला, यामुळे निराश झालेल्या बाळूने आत्महत्येचा प्रयत्न केला. बाळूचं प्रेम पाहून अखेर सपनाने लग्नासाठी होकार दिला. पण समाज आणि कुटुंबातील लोक आपल्याला स्विकारतील का प्रश्न त्यांच्यासमोर होता.
बाळूने कुटुंबियांना दिली माहिती
बाळूने सपनाबरोबरच्या लग्नाची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी सपनाला घरी बोलावून घेतलं, तिच्याशी चर्चा केली. दोघांचंही एकमेकांवरच प्रेम पाहून बाळूच्या कुटुंबियांनी लग्नाला होकार दिला.
'लग्नचा कधी विचारच केला नाही'
तृतीयपंथी सपनासाठीही हे सर्व स्वप्नवत आहे. तृतीयपंथी जीवन जगताना लग्न हा विषय मनात कधी आलाच नाही. मात्र बाळूची ओळख झाली आणि संबंध जुळले, आता लग्न होतंय याचा आनंद असल्याची भावना सपानने व्यक्त केली आहे.
धुमधडाक्यात होणार लग्न
बाळू आणि सपना येत्या सहा मार्चला वाजत गाजत विवाह करणार आहेत. मराठवाड्यातला हा पहिलाच अनोखा विवाह सोहळा आहे.