शरद पवारांसाठी युगेंद्र पवार तर अजित पवारांसाठी जय पवार; बारामतीच्या राजकारणात पवारांची युवा पिढी

Maharashtra politics : बारामती लोकसभेची निवडणूक जिंकायचीच असा पण करत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे द्वितीय पुत्र जय पवार मैदानात उतरले आहेत. 

Updated: Feb 22, 2024, 09:53 PM IST
 शरद पवारांसाठी युगेंद्र पवार तर अजित पवारांसाठी जय पवार; बारामतीच्या राजकारणात पवारांची युवा पिढी title=

जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती : अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना मिळाले आहे. अजित पवार आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अजित पवारांना आता घरातूनच विरोध होऊ लागला आहे. कारण अजित पवारांचा सख्खा पुतण्याच त्यांच्याविरोधात उभा ठाकलाय. अजित पवारांचे धाकटे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार बारामतीत सक्रीय झाले आहेत. शरद पवारांसाठी युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे द्वितीय  पुत्र जय पवार देखील प्रचारात सक्रिय झाले आहेत.

जय पवार आत्याच्या उमेद्वारीविरोधात प्रचार करणार

यंदाच्या  बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होणार असून ही निवडणूक चुरशीशी होणार असल्याचे चित्र सध्या बारामतीत पाहायला मिळत  आहे.  बारामतीतील राजकारण चांगलेच तापले आहे. थेट आपल्या  आत्याच्या उमेदवारी विरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीत बोलताना दिले.

लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र  श्रीनिवास पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी युगेंद्र पवार यांनी पवार साहेबांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.

लोकसभेची तयारी म्हणून जय पवार यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. बारामती तालुक्यात हा दौरा करणार असल्याचे जय पवार यांनी सांगितले. बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले. अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी नुकतीच शरद पवार कार्यालयाला भेट दिली होती. या भेटीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, परिवारात ज्याची पसंती असेल ते लोक त्यांचा प्रचार करतील. जसं दादांनी भाषणात सांगितलं.. की कदाचित परिवारातील बाकीचे काही लोक माझा प्रचार करणार नाहीत. तसं आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही. त्यांना ज्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना करू द्या आपण आपला प्रचार करू. आगामी लोकसभेच्या तयारी बाबत बोलताना पवार म्हणाले की, रॅली, पदयात्रा, भेटीगाठी, बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न असेल..