फ्लोअर टेस्ट : पेहेलवान तर आधीच पळून गेला, भाजपला टोला

सोशल मीडियात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या विधानाची खिल्ली उडवण्यात येत आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 30, 2019, 03:38 PM IST
फ्लोअर टेस्ट : पेहेलवान तर आधीच पळून गेला, भाजपला टोला   title=

मुंबई : महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. ठाकरे सरकारला १६९ आमदारांनी आपला पाठींबा जाहीर केला. भाजप आमदारांनी हा ठराव होण्यापुर्वी सभात्याग केला. त्यामुळे महाविकास आघाडीने हा ठराव १६९-० असा एकतर्फी जिंकला. त्यामुळे भाजपकडे आता ११४ आमदारांचे संख्याबळ राहीले आहे. हा ठराव महाविकास आघाडीने जिंकल्याचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर सोशल मीडियात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या विधानाची खिल्ली उडवण्यात येत आहे. 

विश्वासदर्शक ठरावादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व आमादारांनी सभात्याग केला आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजपच्या सर्व आमदारांनी वॉक आऊट केलं. सभागृहाच्या बाहेर भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. पण पेहेलवान तर आधीच पळून गेला हे विधान सोशल मीडियात चर्चेत आले आहे. 

विधानसभा निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले होते. आमच्या समोर कोणी पेहलवानच उरला नाही असा टोला चिंचवड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला होता.निवडणुका कोणासमोर लढायच्या हेच कळत नाही. आमचे पेहलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत पण आखाड्यात समोर लढायला पेहलवानच नाही असे फडणवीस म्हणाले होते. 'राज्यात कुस्ती हा खेळ महत्वाचा आहे. कुस्तीतील राज्यातील संघटनेचा मी अध्यक्ष आहे' असे उत्तर शरद पवार यांनी त्यांना दिले होते. भाजपने सभात्याग केल्यानंतर या विधानाची आठवण करुन दिली जात आहे. पेहेलवान तर आधीच पळून गेला असे ट्वीट युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले आहे. हे ट्विट रिट्वीट केले जात असून यावरुन सोशल मीडियात सध्या या ट्वीटची चांगलीच चर्चा होत आहे. 

महाविकासआघाडीचं सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. आजपासून दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना व्हिप जारी केला. शिवसेनेकडून सुनील प्रभु यांनी आपल्या आमदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला. विश्वासदर्शक ठरावासाठी शिवसेना आमदार विधानसभेत पोहोचले. विश्वासदर्शक ठरावावेळी इतर लहान पक्षांचा देखील महाविकास आघाडीला मिळाला. दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांना व्हिप जारी केला. उद्धव ठाकरे यांच्या बाजुने मतदान करण्याचा व्हिप जारी करण्यात आला आहे.