'...तर या खासदाराची चड्डीसुध्दा...'; वादग्रस्त Whatsapp पोस्ट करणाऱ्या बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

Beed Police Officer Transferred: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील वातावरण चांगलेच तापलेले असताना आता थेट पोलीस विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 6, 2025, 06:53 AM IST
'...तर या खासदाराची चड्डीसुध्दा...'; वादग्रस्त Whatsapp पोस्ट करणाऱ्या बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली title=
दुसऱ्या दिवशीच झाली बदली (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Beed Police Officer Transferred: बीडचे वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी खासदाराला इशारा देणारी पोस्ट व्हॉट्सअप ग्रुपवर केल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. गणेश मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणेंबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती.

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बीड पोलीस प्रेस ग्रुप’ नावाने व्हॉट्सअपवर एक ग्रुप असून त्यात गणेश मुंडेंनी शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. या पोस्टमुळे पोलीस दलात एकच वादळ उठले. ‘या खासदाराची चड्डीसुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’, अशी पोस्ट गणेश मुंडे यांनी केली होती. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. या हत्येचा तपास आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन पातळीवर सुरु झालेला आहे. या हत्येच्या पाठीशी जे राजकीय लोक आहेत, त्यांच्याबद्दल जनमाणसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे. खासदार सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत बीडमधील सह पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सह पोलीस निरीक्षक दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे. 

...अन् पोस्ट डिलीट केली

खासदार सोनवणे यांच्या मागणीनंतर बीड पोलीस खळबळ उडाली आहे. दहिफळे आणि मुंडे या दोघांबद्दलही सर्वसामान्यासोबतही पोलीस दलात देखील फारसे चांगले बोलले जात नाही. त्यातच गणेश मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली सुरु केलेल्या ‘बीड पोलीस प्रेस ग्रुप’ या व्हाटस्अप ग्रुपवर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. ज्यामध्ये गणेश मुंडेंनी म्हटले होते की, "या खासदाराची चड्डीसुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर!’

नक्की वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?

या पोस्टवर काही पत्रकारांनी विचारपूस केल्यानंतर सदरील पोस्ट मुंडे यांनी डिलिट केली, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी मुंडे यांना ग्रुपमधून काढून टाकले. अशा वाचाळ आणि धमकी देणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर पोलीस अधीक्षक नवनीत कावत काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच रविवारी गणेश मुंडेंच्या बदलीचे आदेश निघाले.

जाहीर भाषणातून दिलं आव्हान

बजरंग सोनावणे यांनी रविवारी पुण्यामध्ये आयोजित जन आक्रोश मोर्चामधील भाषणामध्ये गणेश मुंडेंच्या या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. "प्रेस घे माझं काय उघड पडायचंय पडू दे तू प्रेस घे," असं थेट आव्हान या पोलीस अधिकाऱ्याला दिलं होतं. त्यानंतर काही वेळात या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली.

नक्की वाचा >> 'मातोश्री'वरच्या बैठकीत बाचाबाची! ठाकरे संतापून 'या' नेत्याला म्हणाले, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात'

या चार पोलीस अधिकाऱ्यांचीही झाली बदली

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासा दरम्यान पोलीस दलावर वेगवेगळे आरोप होत असताना रविवारी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत.. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.