पुण्यातील 79 गावांना झिका व्हायरसचा धोका; आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला आहे.

Updated: Aug 11, 2021, 03:27 PM IST
पुण्यातील 79 गावांना झिका व्हायरसचा धोका; आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी

पुणे : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय. पुण्यामध्ये कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होत नाही तोच पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला आहे. बेलसरच्या आजूबाजूच्या 79 गावांवर झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. यानंतर आरोग्य प्रशासनाने या परिसरात अलर्ट जारी केलं आहे.

पुण्यातील बेलसर गावातील 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने तातडीचे पावलं उचलत राज्यात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. केंद्र सरकारच्या आरोग्य पथकाने देखीही बेलसर गावात जाऊन पाहणी केली होती. त्याचप्रमाणे एनआयव्हीच्या तज्ज्ञांसोबत बैठकही आयोजित केली होती.

पुणे जिल्ह्यातील 79 गावांत झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे. या गावांत अलर्ट जारी केला आहे. स्थानिक प्रशासन आणि सर्व ग्रामपंचायत यांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आलेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या गावांची यादीही जाहीर केली आहे. या 79 गावांत गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. ही गावे झिका व्हायरससाठी अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळं गावातील लोकं आणि अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

झिका विषाणूचा संसर्ग हा डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. एडीज डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. पण हा आजार जीवघेणा नाही. मात्र, तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी लहान असू शकतं.