वाहन चालकांनो सावधान! मास्क नसेल तर होणार ही कारवाई...

परिवहन विभागाने घेतलाय हा निर्णय  

Updated: Jan 5, 2022, 10:15 PM IST
वाहन चालकांनो सावधान! मास्क नसेल तर होणार ही कारवाई... title=

औरंगाबाद : राज्यात वाढत्या कोरोनामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाने आपापल्या जिल्ह्यात नियम, निर्बंध अधिक कडक केले आहेत. नागरिकांनी या नियमांचे पालन करावे अन्यथा कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने एक कठोर निर्णय घेतला आहे.

अन्य जिल्ह्याप्रमाणेच औरंगाबादमध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत. यासाठी प्रशासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यानुसार कोविड टेस्ट positive आल्यावर रुग्णाला गृह विलगीकरणात  (Home isolation) राहायचे असल्यास घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण झालेले असणे तसेच positive रुग्णाच्या घरातील अन्य सदस्यांनी Home Quartine राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याचसोबत जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत. या अधिकारयांना निरनिराळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

हुरडा पार्टीवर पूर्णतः निर्बंध घालण्यात आले असून हुरडापार्टी सुरू असल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शहराबाहेरील फार्म हाऊस/ रिसॉर्टवर बंदी असून ते सुरू दिसल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

लसीकरण आणि मास्क नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल न देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र, आता मास्क न घालणाऱ्या वाहन चालकांचे थेट लायसन्स रद्द करण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे.

आतापर्यत या कारवाईपोटी १८७५ वाहन चालकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहेत. तसेच, कारवाई झाल्यास ते वाहन विक्री करता येणार नाही असाही निर्णय घेतला आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.