शेळ्या हाकण्यासाठी उतरला आणि शाळेची बस पायावरुन गेली

गांधेली गावाजवळ बससमोर शेळ्या आल्या.

Updated: Aug 25, 2018, 08:09 PM IST
शेळ्या हाकण्यासाठी उतरला आणि शाळेची बस पायावरुन गेली

औरंगाबाद: बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे औरंगाबादमध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ओम वाघ असे या मुलाचे नाव असून तो शिवछत्रपती शाळेत शिकतो. 

ओम गुरुवारी स्कूल बसने आडगावहून शाळेच्या दिशेने निघाला होता. यावेळी गांधेली गावाजवळ बससमोर शेळ्या आल्या. या शेळ्यांना बाजूला करण्यासाठी ड्रायव्हरने ओमला बसमधून खाली उतरायला सांगितले. 

ओमने शेळ्या हाकल्या, मात्र त्यानंतर तो पुन्हा बसमध्ये बसला की नाही, याची खातरजमा न करता चालकाने बस सुरु केली. यामध्ये ओम जखमी झाला. चालक एवढ्यावरच थांबला नाही. त्याने ओमच्या बहिणीला खाली उतरवले आणि दवाखान्यात जाण्यास सांगितले. त्यानंतर ओमच्या पालकांनीच त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे.